छोटय़ा डिशद्वारे हायस्पीड इंटरनेट सेवा प्रदान
रशियाकडून लादण्यात आलेल्या युद्धाचा मार झेलणाऱया युक्रेनसाठी ऍलन मस्क एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या अनेक भागांमध्ये वीज, दूरसंचार यंत्रणा, इंटरनेट सर्वकाही ठप्प आहे. तर मस्क यांची कंपनी स्पेसएक्सकडून निर्मित छोटय़ा-छोटय़ा सॅटेलाइट टर्मिनल्सच्या मदतीने युक्रेनच्या दुर्गम भागांमध्ये देखील लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. सर्वसाधारणपणे इंटरनेटसाठी समुद्रातून केबल्सचे जाळे टाकले जाते. पण मस्क यांच्या कंपनीने उपग्रहाद्वारे कुठेही इंटरनेट सेवा देण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सॅटेलाइट टर्मिनल्स याचाच हिस्सा आहे.
युक्रेनच्या पत्रकार क्रिस्टीना बर्दिंस्कीख यांनी एक छायाचित्र ट्विट केले. कीव्हनजीक इवानकीव्ह गावातील या छायाचित्रात काही लोक एका ठिकाणी एकत्र येत स्वतःचा मोबाइल हाताळताना दिसून येतात. या लोकांदरम्यान एक सॅटेलाइट डिश ठेवण्यात आली होती. “ही आहे ऍलन मस्क यांची पॉवर. इवानकीवमध्ये वीज, मोबाइल कम्युनिकेशन आणि इंटरनेट सुविधा उद्ध्वस्त झाली आहे. परंतु स्टारलिंकमुळे येथील लोकांना पहिल्यांदाच स्वतःच्या निकटवर्तीयांशी संपर्क करता येतोय’’ असे त्यांनी नमूद केले आहे.
इंटरनेट सेवा पुरविण्याचे कार्य
युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनच्या एका मंत्र्याने मस्क यांना देशात इंटरनेट सुविधा उपलब्ध करविण्याची विनंती केली होती. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी मस्क यांच्या कंपनीने स्वतःच्या स्टारलिंग सर्व्हिसला युक्रेनमध्ये ऍक्टिव्हेट केले होते. कंपनीने तेथे हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी अंतराळातील स्वतःच्या उपग्रहाची कक्षा बदलली आहे. युक्रेनमध्ये 5 हजार स्टारलिंक टर्मिनल्स पाठविण्यात आले आहेत.
अमेरिकेकडून मोठा खर्च
स्पेसएक्सने युक्रेनला 3,667 इंटरनेट टर्मिनल्स दान केले आहेत, याची किंमत 1 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे. कंपनी याचबरोबर 3 महिन्यांचा डाटाही मोफत प्रदान करतेय. युक्रेनमध्ये इंटरनेट टर्मिनल पाठविण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाकडून कुठलीच रक्कम मिळाली नसल्याचा दावा स्पेसएक्सकडून करण्यात येतो. परंतु अमेरिकेच्या प्रशासनाने हे टर्मिनल्स खरेदी करणे आणि युक्रेनमध्ये पोहोचविण्यासाठी सुमारे 20 लाख डॉलर्स खर्च केल्याचा दावा एक प्रसारमाध्यमाने केला आहे.