चीनपासून देशवासीयांचे रक्षण करणारच : अध्यक्षा साइ इंग वेन यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /तैपैई
चीनकडून तैवानवर हल्ला करण्यात आल्यास अमेरिका आणि अन्य क्षेत्रीय लोकशाहीवादी देश मदतीसाठी धावून येतील, असा आपल्याला पूर्ण विश्वास असल्याचे उद्गार तैवानच्या अध्यक्षा साइ इंग वेन यांनी काढले आहेत. वेन यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
एक दिवस अगोदरच अमेरिकेने तैवानसोबत चीनच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे वक्तव्य केले होते. चीन सातत्याने स्वतःच्या सीमेबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेकडून तैवानसोबतच्या अर्थपूर्ण भागीदारीवर भर देण्यात आला आहे.
तैवान हा लोकशाहीवादी देश असल्याने आम्ही एकटे नाही आहोत. आम्ही स्वातंत्र्याचा आदर करतो आणि शांततेचे उपासक आहोत. याचबरोबर आम्ही या क्षेत्रातील अन्य देशांची मूल्ये आणि त्यांच्या भौगोलिक क्षेत्राचाही पूर्ण सन्मान करतो. आम्ही हे क्षेत्र आणि यात सामील देशांच्या सामरिक महत्त्वालाही जाणतो. चालू दशकात तैवान आणि चीनचे संबंध अत्यंत बिघडले असल्याचे साइ इंग वेन यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
चालू महिन्याच्या प्रारंभी चीनने अनेकदा स्वतःच्या लढाऊ विमानांना तैवानच्या वायुक्षेत्रात पाठविले होते. चीनच्या या घुसखोरीला रोखण्यासाठी तैवानने देखील तातडीने पावले उचलली आहेत. पण या सर्व प्रकारामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. यावरून चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनादिनी तैवानला कुठल्याही प्रकारे चीनच्या मुख्य भूमीत सामील करणार असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे सैन्य तैवानमध्ये
चीनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे म्हणत अमेरिकेचे सैन्य तैवानच्या भूमीवर असल्याची पुष्टी साइ यांनी यावेळी दिली आहे. अमेरिकेचे सैन्य तैवानमध्ये प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने पोहोचले आहे. तैवान लोकशाहीवादी मूल्ये आणि तत्वांना जाणतो आणि त्यांचा पूर्ण आदरही करत असल्याचे साइ म्हणाल्या.
ठोस प्रत्युत्तर देऊ
अमेरिकेसोबत मिळून चीनच्या प्रत्येक हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर देणार असल्याचे तैवानने स्पष्ट केले आहे. आमच्या देशातील सुमारे 2.30 कोटी लोक प्रतिदिन स्वतःचे आणि देशाच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. तैवानचे लोक स्वातंत्र्यासाठी पात्र असून सरकार याकरता प्रतिबद्ध असल्याचे वेन यांनी म्हटले आहे.