माळमारूती चॅम्पियन्स लीग
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित माळमारूती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात युनियन जिमखाना संघाने ऍडव्होकेट संघाचा आठ गडय़ानी तर सिग्नेचर संघाने आरएस वॉरियर्स गोकाक संघाचा 75 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. शतकवीर संतोष चव्हाण (सिग्नेचर), मिलिंद चव्हाण (जिमखाना) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऍडव्होकेट संघाने 20 षटकात 9 बाद 142 धावा केल्या. सुनील सक्रीने 26, विजय कोरेने 25 तर विशाल गौरगोंडाने 24 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे सचिन कुलकर्णीने 32 धावात 4, किरण तारळेकरने 28 धावात 2 तर मिलिंद चव्हाणने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 13.4 षटकात 2 बाद 143 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. मिलिंद चव्हाणने 2 षटकार, 10 चौकारांसह 32 चेंडूत 57, रोहित देसाईने 2 षटकार, 3 चौकारासह 22 चेंडूत 35 तर रोहित पोरवालने 2 षटकार, 3 चौकारासह 21 चेंडूत 33 धावा केल्या. ऍडव्होकेटतर्फे विजय कोरी, सुनील सक्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया उपांत्य सामन्यात सिग्नेचर संघाने 20 षटकात 5 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. संतोष चव्हाणने 8 उत्तुंग षटकार व 10 चौकारासह 63 चेंडूत 112 धावा करून शतक झळकविले. त्याला प्रसाद नाकाडीने 4 चौकारासह 19, योगेश जाधवने 2 चौकारासह 17 धावा करून सुरेख साथ दिली. आरएस वॉरियर्सतर्फे सुनील पाटीलने 33 धावात 2, अनिल नाईकने 40 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आरएस वॉरियर्स संघाचा डाव 18 षटकात सर्व बाद 126 धावात आटोपला. सुनील पाटीलने 1 षटकार, 5 चौकारासह 37, राहुल बजंत्रीने 4 चौकारासह 21 तर भावीत पुजारीने 4 चौकारासह 18 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे भरत गाडेकरने 15 धावात 4 तर विनायक सिद्दलींगने 17 धावात 4 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्या आरती पोरवाल, अमृता चौगुले व चेतन बैलूर यांच्या हस्ते सामनावीर मिलींद चव्हाण व इम्पॅक्ट खेळाडू सचिन कुलकर्णी यांना तर दुसऱया उपांत्य सामन्यात प्रमुख पाहुणे राहुल जारकीहोळी, चंद्रकांत कडोलकर, ईरण्णा, सदानंद यांच्या हस्ते सामनावीर संतोष चव्हाण, इम्पॅक्ट खेळाडू भरत गाडेकर यांना चषक देवून गौरविण्यात आले. गुरूवारी युनियन जिमखाना वि. सिग्नेचर इलेव्हन यांच्यात दुपारी 12 वा. अंतिम सामना खेळविण्यात येईल.