माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमद इंग्लंड दौऱयासाठी फिरकी गोलंदाज प्रशिक्षक
कराची
पाकिस्तानने माजी कर्णधार युनूस खानची इंग्लंड दौऱयावर जाणाऱया राष्ट्रीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी आणि मुश्ताक अहमदची फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असल्याचे मंगळवारी जाहीर केले.
42 वर्षीय युनूस खानने 118 कसोटीत 10,099 धावा जमविल्या असून 313 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. कारकिर्दीत त्याने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनात पहिले स्थानही मिळविले होते. 30 जुलैपासून पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱयावर जाणार असून त्यात तीन कसोटींची मालिका होणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्टपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका होईल. ‘फलंदाजीचे उत्कृष्ट रेकॉर्ड असलेल्या युनूसने ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली, याचा आम्हाला आनंद वाटतो. त्याचा अनुभव, इंग्लिश वातावरणातील तयारी, डावपेच यांचा संघाला लाभ मिळणार असून अनेक खेळाडूंचा आदर्श असल्याने त्याला संघात आदराचे स्थानही मिळेल,’ असे पीसीबीचे प्रमुख कार्यकारी वासिम खान म्हणाले.
माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमदने कारकिर्दीत 52 कसोटींत 185 बळी मिळविले असून तो मार्गदर्शक म्हणूनही काम पाहणार आहे. फिरकी गोलंदाज प्रशिक्षक या नात्याने त्याने याआधी इंग्लंड व विंडीज संघांना मार्गदर्शन केले आहे. ‘इंग्लिश कौंटीत तो बराच काळ खेळला असल्याने तसेच इंग्लंड संघाला मार्गदर्शन केले असल्याने मुश्ताकला इंग्लिश वातावरणाचा चांगला अनुभव आहे. त्याचा लाभ संघाला निश्चितच होईल,’ असे खान यांना वाटते. स्पिनर्सना आणि खेळाडूंना मार्गदर्शन करण्याबरोबरच मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकला संघाची तयारी आणि डावपेच आखण्यातही तो मदत करू शकतो, असेही खान म्हणाले. वकार युनूस हा या संघाचा वेगवान गोलंदाज प्रशिक्षक आहे.