वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) यांनी प्रत्येक महिन्याला, तिमाही किंवा सहामाहीसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) ऑटो पे ही सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कोणत्याही युपीआय ऍप्लिकेशनचा वापर करुन रिकरिंग पेमेंटसह मोबाईल बिल, वीज बिल, इएमआय, ओटीटी, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि कर्जाच्या हप्त्यासोबत अन्य प्रकारची रक्कम जमा करण्यासाठी ही सुविधा वापरता येणार असल्याची माहिती एनपीसीआय यांच्याकडून देण्यात आली आहे.
सदरची सुविधा वापरण्यासाठी फक्त एकदा खात्याला सर्टिफाइड ग्राहकांना एका वेळी युपीआय पिनच्या आधारे खात्याला प्रमाणित करावे लागणार असून त्यानंतर आपोआप आपल्या खात्यामधून पेमेंट होणार आहे. युपीआय ऑटो-पे सुविधेच्या आधारे सिंगल पेमेंटसोबत दैनिक, साप्ताहीक, 15 दिवस, प्रति महिना, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर ही पेमेंट करण्याची सोय असून 2000 रुपयापर्यंतच्या पेमेंटसाठी युपीआय पिन आवश्यक नसणार आहे.
अगोदरपासूनच ही सुविधा
काही बँकांमध्ये ही सुविधा अगोदरपासून आहे. यामध्ये बँक, विपेता आणि ऍग्रीगेटर युपीआय ऑटो-पेची सुविधा ग्राहकांना देत आले आहेत. या यादीमध्ये ऍक्सीस बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी बँक, पेटीएम पेमेंट बँक, ऑटोपे दिल्ली मेट्रो, पॉलिसी, पेटीएम आदींचा समावेश आहे.
युपीआयला वाढती पसंती
कोविडच्या संसर्गामुळे विविध क्षेत्रात ऑनलाईनचा वापर करुन व्यवहार करण्यावर भर दिला जातोय. यामध्ये आर्थिक क्यवहारही मोठय़ा प्रमाणात डिजिटल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. पेमेंट करण्यासाठी युपीआयला पसंती मिळते आहे.