वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेतील लोक वगळता अन्य सर्वजण आपापल्या घरात बंदीस्त झाले आहेत. तसेच या काळात आपली विविध कामे पुढे ढकलण्याचा विचार अनेकजण करत आहेत. दुसरीकडे आर्थिक सर्व प्रकारची कामे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करुन करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये युपीआयच्या मदतीने सुरक्षित व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊनच्या कारणामुळे ग्राहकांनी डिजिटल बँकींगच्या वापरात वाढ केली आहे. दुसरीकडे ऑनलाईन फसवणूकीची प्रकरणे समोर येत आहेत. याबाबत नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय) यांची युनीफाइड पेमेन्ट् इंटरफेस (युपीआय) यांचा वापर करणे अगदी सोपे आणि सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. भीम युपीआय या मोबाईल ऍपला डाऊनलोड करुन आपले बँक खाते या ऍपला जोडू शकतो व त्यावरून व्यवहार करू शकतो. त्यांच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारचे व्यवहार अगदी सहज आणि सुरक्षित करु शकता असेही एनपीसीआय यांनी सांगितले आहे.