वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे मागील काही दिवसांपासून आर्थिक व्यवहारांचा कल ऑनलाईनकडे वाढला असल्याचे पहावयास मिळत आहे. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या(एनपीसीआय)आकडेवारीनुसार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (युपीआय) पेमेंट्सच्या माध्यमातून जूनमध्ये 2.62 लाख कोटी रुपयांची देवाण-घेवाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
जून महिन्यात 134 कोटी व्यवहाराच्या माध्यमातून जवळपास 2.62 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण करण्यात आली आहे. आकडय़ाच्या आधारे मे 2020 मध्ये 1.23 अब्जची देवाण घेवण करण्यात आली होती. परंतु यातुलनेत जूनमध्ये 8.94 टक्के वृद्धी झाली आहे. याअगोदर एप्रिलमध्ये कोरोना महामारीच्या कारणामुळे लॉकडाऊन कडक होते तेव्हा युपीआय देवाणघेवाण घटून 99.95 कोटीवर राहिली होती. याच दरम्यान एकूण 1.51 लाख कोटी रुपयांची देवाण -घेवाण झाली.
केंद्र सरकारकडून लॉकडाऊनऐवजी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आल्यापासून उद्योगधंदे आणि अन्य व्यापाराच्या व्यवहारांमध्ये तेजीचा प्रारंभ सुरु झाला आहे. या सुधारलेल्या वातावरणामुळे ऑनलाईन पेमेंटमध्ये मे महिन्यापासून हळूहळू वाढ होत गेल्याचे पहावयास मिळाले.
एनपीसीआय रुपे कार्ड, तत्काळ पेमेंट्स सेवा(आयएमपीएस), युपीआय, भारत इंटरफेस फॉर मनी (भीम), भीम आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन(एनइटीजी फास्टटॅग)आणि भारत बिल पे यासारख्या सेवांच्या माध्यमातून व्यवहार झाले आहेत.