ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
नुकतेच योगी सरकारने प्रदेशात 18 वर्षांवरील सर्वानाच निःशुल्क लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता केरळमध्ये देखील सर्व पात्र नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी बुधवारी केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री विजयन यांनी ही घोषणा केली आहे. केरळमध्ये सर्वांना मोफत लस दिली जाईल. आम्हाला इतरांसारखी भूमिका बदलण्याची सवय नाही. आम्ही राज्यात राज्यात मोफत लसीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे विजयन यांनी म्हटले आहे.
- बिहारमध्येही मोफत लसीकरण सुरू
दरम्यान, बिहारमध्ये आधीपासूनच लसीकरण मोफत सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच एनडीएने सत्तेत आल्यास मोफत कोरोना लस देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सत्तेत आल्यावर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मोफत कोरोना लस देण्यावर शिक्कमोर्तब झाले. तेव्हापासून सर्वांना मोफत लस दिली जात आहे. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ट्विट करत राज्यात पात्र नागरिकांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केली आहे.
यासोबतच आसाम आणि छत्तीसगड राज्यात देखील मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार मोफत लासिकरणाबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.