- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून श्रद्धांजली
ऑनलाईन टीम / मुजफ्फरनगर :
उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण आणि महसूल राज्य मंत्री तसेच मुजफ्फरनगरचे चरथावल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. मागील 20 दिवसांपासून त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास अंतिम श्वास घेतला. ते 52 वर्षांचे होते.
विजय कश्यप हे सहारनपूर जिल्ह्यातील कस्बा नानौता येथील रहिवासी होते. तिथेच त्याचे कुटुंब असून त्यांचे भाऊ अजय कश्यप यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
विजय कश्यप यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. भाजाप नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या विजय कश्यप यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे. ते सर्वासामान्यांशी जोडलेले नेते होते. त्यांनी कायम लोकांच्या हिताची काम केली. या दु:खद प्रसंगी माझ्या सद्भावना त्यांच्या नातेवाईक आणि समर्थकांसोबत आहेत. ओम शांति, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय कश्यप यांच्या निधनानंतर ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, विजय कश्यप एक लोकप्रिय नेते होते. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री म्हणून त्यांनी आपली कर्तव्य कायमच कौशल्यपूर्वक पद्धतीने पार पाडली. कश्यप यांच्या निधनामुळे जनतेने त्यांचे हीत जपणारा एक नेताम गमावाला आहे, असे योगी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कश्यप यांच्या आत्म्याला शांती मिळो असे म्हणत आपल्या सद्भावना कश्यप यांच्या नातेवाईकांसोबत असल्याचे सांगितले.
विजय कश्यप हे भाजपाच्या तिकीटावर सन 2007 आणि 2012 मध्ये चरथावल विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढले होते. मात्र 2017 साली ते भाजपाच्या तिकीटावर लढून पहिल्यांदा निवडून आले. 2019 साली ऑगस्ट महिन्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तेव्हा विजय कश्यप यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे प्राण गमावलेले विजय कश्यप हे पाचवे आमदार आहेत. यापूर्वी भाजपच्या चार आमदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी, ओरैया विधानसभेचे भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव आणि बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांनी आपला जीव गमावला आहे.