वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या 117 व्या सामन्यात प्रदीप नरवालच्या शानदार कामगिरीच्या जोरावर युपी योद्धा संघाने दबंग दिल्लीचा 44-28 अशा गुणांनी पराभव केला. या विजयामुळे युपी योद्धा संघाच्या प्ले ऑफ गटातील स्थान मिळविण्याच्या स्थितीमध्ये थोडा फरक झाला आहे.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत विक्रमी सर्वाधिक वेळा सुपर 10 गुण नोंदविणाऱया प्रदीप नरवालने सोमवारच्या सामन्यात सुपर 10 गुणांसह (14 गुण) नोंदविले. या सामन्यातील विजयामुळे युपी योद्धा संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले असून लीग गटातील त्यांचा एक सामना बाकी आहे. या सामन्यातील पराभवामुळे दबंग दिल्ली संघाने आघाडीच्या दुसऱया क्रमांकाची संधी गमविली.
सोमवारच्या सामन्यात पहिल्या 10 मिनिटात दोन्ही संघ 7-7 असे बरोबरीत होते. 16 व्या मिनिटाअखेर या दोन्ही संघांनी 10-10 अशी बरोबरी कायम राखली होती पण त्यानंतर प्रदीप नरवालच्या आक्रमक खेळामुळे युपी योद्धा संघाने दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद केले. मध्यंतरापर्यंत युपी योद्धाने दबंग दिल्लीवर 18-12 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धातील खेळाच्या पहिल्या 10 मिनिटापर्यंत युपी संघाने 7 गुणांची आघाडी राखली होती. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना दबंग दिल्लीचे दुसऱयांदा सर्वगडी बाद झाल्याने युपी योद्धा संघाने 10 गुणांची आघाडी मिळविली होती. प्रदीप नरवालच्या चढाईवर युपी योद्धा संघाने 15 गुणांची बढत घेतली होती. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना दिल्ली दबंगचे तिसऱयांदा सर्वगडी बाद झाल्याने युपी योद्धा संघाने हा सामना 16 गुणांच्या फरकाने जिंकला.