पाटणा पायरेट्स-तामिळ थलैवाज चुरशीचा सामना टाय
वृत्तसंस्था /पुणे
बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बुधवारी झालेल्या एका सामन्यात युपी योद्धाज संघाने विद्यमान विजेत्या दबंग दिल्लीचा 50-31 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला. तर पाटणा पायरेट्स आणि तामिळ थलैवाज यांच्यातील चुरशीचा सामना 33-33 असा बरोबरीत राहिला.
युपी योद्धाज आणि विद्यमान विजेता दबंग दिल्ली यांच्यातील सामन्यात युपी योद्धाजचा कर्णधार प्रदीप नरवालने दर्जेदार कामगिरी केली. या सामन्यात प्रदीप नरवालने आपल्या वैयक्तिक चढायांवर 22 गुण मिळवित सामनावीराचा पुरस्कार घेतला. या स्पर्धेत युपी योद्धाज संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. त्यांनी गेल्या पाच सामन्यात एकही पराभव पत्करलेला नाही. स्पर्धेच्या गुणतक्त्यात युपी योद्धाज संघाने 45 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. सकाळच्या सत्रातील झालेल्या सामन्यात प्रदीप नरवाल आणि सुरिंदर गिल यांच्या आक्रमक चढायांमुळे दबंग दिल्ली संघावर चांगलेच दडपण आले. सतराव्या मिनिटाला दबंग दिल्लीचे सर्व गडी बाद झाले. युपी योद्धाजचा हुकमी रायडर रोहित तोमरने आपल्या एका चढाईवर 4 गुण मिळविले. त्याने या सामन्यात एकूण 10 गुण नोंदविले. मध्यंतरापर्यंत युपी योद्धाजने 29-14 अशी आघाडी दबंग दिल्लीवर मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात प्रदीप नरवालचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाल्याने युपी योद्धाजची आघाडी अधिकच वाढली. युपी योद्धाजने सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना 42-21 अशी भक्कम बढत मिळविली होती. शेवटच्या पाच मिनिटांच्या कालावधीत दबंग दिल्लीकडून थोडा प्रतिकार झाल्याने युपी योद्धाजने हा सामना 50-31 अशा 19 गुणांच्या फरकाने जिंकला. युपी योद्धाज संघातील चार सदस्यांनी आपल्या चढायांवर 9 गुण तर प्रदीप नरवालने आपल्या चढायांवर 11 गुण मिळविले. दबंग दिल्लीतर्फे विजय मलिकने 13 गुण नोंदविले.
पाटणा पायरेट्स आणि तामिळ थलैवाज यांच्यातील शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना 33-33 असा बरोबरीत (टाय) राहिला. या सामन्यात तामिळ थलैवाजचा हुकमी रायडर नरेंदरने 16 गुण नोंदवित सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार घेतला. पाटणा पायरेट्सकडून सचिनचा खेळ अधिक आक्रमक झाला. त्याने 14 गुण नोंदविले. सामन्यातील पहिल्या पाच मिनिटात दोन्ही संघ 5-5 असे बरोबरीत होते. त्यानंतर तामिळ थलैवाजच्या सचिनने आपल्या चढाईवर 2 गुण मिळविल्याने तामिळ संघाने 7-5 अशी 2 गुणांची आघाडी मिळविली होती. पाटणा पायरेट्सचा अष्टपैलू मोहम्मदेजा चियानाने पुन्हा आपल्या संघाला 7-7 अशी बरोबरी साधून दिली. मध्यंतराला पाटणा पायरेट्सने तामिळ थलैवाजचे सर्व गडी बाद करत 20-14 अशी 6 गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात तामिळ थलैवाजच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गुण मिळविण्यास प्रारंभ केला. 26 व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सचा संघ 23-17 असा आघाडीवर होता. पाटणा पायरेट्सच्या नरेंदरला तामिळ थलैवाजच्या निरजकुमार आणि मोहम्मदेजा यांनी बाद केले. त्यामुळे तामिळ थलैवाजने पाटणा पायरेट्सची आघाडी खूपच कमी केली. यावेळी दोन्ही संघात केवळ 3 गुणांचा फरक होता. 30 व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने पुन्हा 5 गुणांची आघाडी मिळविली होती. तामिळ थलैवाजने पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद करत 37 व्या मिनिटाला 30-30 अशी बरोबरी केली. रोहित गुलिया आणि सचिन यांनी आपल्या चढायांवर पाटणा पायरेट्सचे काही गडी बाद करत आपल्या संघाला 33-31 अशी 2 गुणांची बढत मिळवून दिली होती. पण शेवटच्या क्षणी तामिळ थलैवाजने पाटणा पायरेट्सला 33-33 असें बरोबरीत रोखून हा सामना टाय राखला.