वृत्तसंस्था/ हैदराबाद
नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात युपी योद्धाज संघाने पाटणा पायरेट्सचा 35-33 अशा 2 गुणांच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील युपी योद्धाजचा हा नववा विजय आहे. दुसऱया एका सामन्यात अस्लम इनामदार आणि पंकज मोहिते यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटनने तेलुगू टायटन्सचे आव्हान 38-25 अशा 13 गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले.
युपी योद्धाज आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. युपी योद्धाज संघाचा कर्णधार आणि हुकमी रायडर प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या आपल्या वैयक्तिक कारकीर्दीत 75 वी सुपर-10 ची नोंद केली. या सामन्यात नरवालने आपल्या चढाईवर 15 गुण मिळविले. युपी योद्धाज संघाकडून पदार्पण करणाऱया संदीप नरवालने या सामन्यात अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविताना 5 महत्त्वाचे गुण हस्तगत करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली. या सामन्यात संदीप नरवालला गेमचेंजर सामना पुरस्कार मिळाला. प्रदीप नरवालला या सामन्यात परिपूर्ण कबड्डीपटूचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या दहा मिनिटांच्या कालावधीत युपी योद्धाजने पाटणा पायरेट्सचे सर्वगडी बाद केले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 15-15 असे बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तरार्धात युपी योद्धाजने दुसऱयांदा पाटणा पायरेट्सचे सर्वगडी बाद करून 23-16 अशी आघाडी घेतली. पाटणा पायरेट्सने आपल्या अचूक आणि हुकमी डावपेचावर युपी योद्धाजची आघाडी बरीच कमी केली. सहा मिनिटे बाकी असताना युपी योद्धाज संघ केवळ एका गुणाने आघाडीवर होता. शेवटच्या दोन मिनिटांच्या कालावधीत युपी योद्धाजच्या रायडर्सनी आणखी एक गुण मिळवित पाटणा पायरेट्सचे आव्हान 35-33 अशा 2 गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले.
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या दुसऱया एका सामन्यात पुणेरी पलटनने तेलगू टायटन्सचा 38-25 अशा 13 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात पुणेरी पलटनतर्फे अस्लम इनामदार तसेच पंकज मोहिते आणि आकाश शिंदे यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. सामन्याच्या मध्यंतरावेळी पुणेरी पलटनने तेलगू टायटन्सवर 14-10 अशी 4 गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पुणेरी पलटनने तेलगू टायटन्सचे पहिल्यांदा सर्वगडी बाद करून आपली आघाडी आणखी 4 गुणांनी वाढविली. पंकज मोहितेच्या शानदार चढाईवर तेलगू टायटन्सचे विशाल भारद्वाज, टी. आदर्श आणि परवेझ हे बाद झाले. पंकजच्या या सुपर रेडवर पुणेरी पलटनने दुसऱयांदा तेलगू टायटन्सचे सर्वगडी बाद करून साम्घ्ना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना 27-11 अशी 16 गुणांची भक्कम आघाडी मिळविली. तेलगू टायटन्सकडून शेवटच्या दहा मिनिटातही पुणेरी पलटनला फारसा प्रतिकार न झाल्याने पुणेरी पलटनने ही लढत 13 गुणांच्या फरकाने जिंकली.