वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो. कबड्डी लीग स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या 69 व्या सामन्यात युपी योद्धाने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सचा 40-36 अशा गुणांनी पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली तर दुसऱया एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीचा 36-33 असा पराभव केला.
युपी योद्धा-बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामन्यात युपी योद्धाचे सुमीत आणि नितेशकुमार यांनी प्रत्येकी 7 गुण तसेच या संघातील प्रमुख रायडर्स प्रदीप नरवाल आणि सुरिदर गिल यांनी प्रत्येकी 9 गुण नोंदविले. बंगालचा कर्णधार मणिंदर सिंगने आपल्या चढायामध्ये 19 गुण पटकाविले पण त्यांना शेवटी हार पत्करावी लागली. मध्यंतरापर्यंत युपी योद्धा संघाने बंगाल वॉरियर्सवर 19-18 अशी नाममात्र आघाडी मिळविली होती. बंगालचा मणिंदर सिंगने युपी योद्धाचे सर्व गडी बाद करून सुपर 10 गुण मिळविले. शेवटच्या 2 मिनिटांच्या कालावधीत युपी योद्धाने चार गुणांची आघाडी घेत विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सचे आव्हान संपुष्टात आणले.
दुसऱया एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीचा 36-33 अशा गुणांनी पराभव केला. हरियाणा स्टीलर्सच्या विजयामध्ये कर्णधार विकास कांडोलाची चमक दिसून आली. त्याने सुपर 10 गुणांसह एकूण 13 गुण मिळविले. या सामन्यात दबंग दिल्लीला नवीनकुमारची उणीव चांगलीच भासली. पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत हरियाणाने आपले वर्चस्व राखले होते. विकास कांडोलाला विनय आणि आशीश यांची चांगली साथ लाभल्याने 15 व्या मिनिटाला त्यानी दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद केले. मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीवर 19-11 अशी आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास 7 मिनिटे बाकी असताना हरियाणा स्टीलर्सचे 3 गुणांची आघाडी राखली होती. दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सचे सर्व गडी बाद करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. पण, शेवटच्या दोन मिनिटामध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी तीन गुणांची आघाडीत दिल्ली दबंगचे आव्हान संपुष्टात आणले.