- 10 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात वाढत चाललेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेत योगी सरकारने लॉकडाऊन सोमवारपर्यंत (10 मे) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. पण सद्य स्थिती लक्षात घेऊन पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीम 9 सह सुरू असलेल्या बैठकीत दिले आहेत. 29 एप्रिल रोजी योगी सरकारने यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 3 मे रोजी आणखी दोन दिवसांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
यासोबतच योगी सरकारने मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क न घालता बाहेर पडल्यास पहिल्या वेळी 10 हजार रुपये दंड केला जाणार आहे. तर दुसऱ्यांदा मास्क न घालता बाहेर पडल्यास 10% अधिक दंड वसूल केला जाणार आहे. तसेच कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.