बेलारुसमध्ये निवडणूक : 65 वर्षीय अध्यक्षाला 26 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोठे आव्हान : स्वेतलाना यांना जनतेचा मोठा पाठिंबा
वृत्तसंस्था/ मिंस्क
रशियाच्या पश्चिम सीमेला लागून असलेल्या बेलारुसमध्ये 6 व्यांदा निवडणूक पार पडली आहे. 25 ऑगस्ट 1991 रोजी सोव्हिएत संघातून बाहेर पडत बेलारुस स्वतंत्र देश झाला होता. बेलारुसने त्यानंतर राज्यघटना स्वीकारून जून 1994 मध्ये पहिली अध्यक्षीय निवडणूक पार पाडली होती. अलेक्झेंडर लुकाशेंको हे अध्यक्ष झाले होते. 1994 पासून 5 वेळा निवडणूक झाली असून लुकाशेंको हेच अद्याप अध्यक्ष आहेत. लुकाशेंको यांना हुकुमशहाच मानले जाते. प्रत्येक निवडणुकीत गैरप्रकार घडवून आणण्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. परंतु 26 वर्षांमध्ये पहिल्यांदाच लुकाशेंको यांच्यासमेर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
यंदाच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात 37 वर्षीय स्वेतलाना हिने मोठे आव्हान उभे केले आहे. स्वेतलाना यांच्या पतीला लुकाशेंको प्रशासनाने तुरुंगात डांबले होते. लुकाशेंको पुन्हा एकदा गैरप्रकार घडवून आणत विजय मिळवू शकतात असे मानले जात आहे. परंतु पहिल्यांदाच लुकाशेंको यांच्यासमोर लोकप्रियतेत मागे पडण्याचे संकट निर्माण झाले आहे. स्वेतलाना यांच्यासोबत लोक उभे राहत आहेत. लुकाशेंको यांची हुकुमशाही आणि कोरोना महामारीसंबंधी बेजबाबदार भूमिकेमुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे. व्होडका पिऊन आणि ट्रक्टर चालवून कोरोना बरा होतो, असे लुकाशेंको म्हणत आले आहेत.
स्वेतलाना यांची पार्श्वभूमी
स्वेतलाना यापूर्वी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती सरहेई हे लोकशाहीवादी कार्यकर्ते आहेत. लुकाशेंको प्रशासनाने त्यांना तुरुंगात डांबले आहे. या प्रकारानंतर स्वेतलाना यांनी स्वतः लढय़ात भाग घेत नेतृत्व स्वीकारले आहे. अलिकडेच स्वेतलाना यांच्या प्रचार व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली आहे.
अन्य उमेदवार
लुकाशेंको आणि स्वेतलाना यांच्यासह निवडणुकीत आणखी 3 उमेदवार आहेत. यात खासदार एना कनोपत्सेकाया, सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते सर्जेई चेर्चेन आणि टेल द ट्रूथ मूव्हमेंटचे सहअध्यक्ष एंड्रेई द्मित्रियेव्ह सामील आहेत.
लुकाशेंकोंचा सत्ताकाळ
रशिया आणि युरोपीय महासंघातील भांडणाचा लुकाशेंको यांनी लाभ उचलून स्वतःची सत्ता राखली आहे. लुकाशेंको कधी युरोपीय महासंघाच्या गोटात शिरतात तर कधी रशियाच्या पुतीन यांना समर्थन देतात. निवडणुकीतील गैरप्रकारानंतर युरोपीय महासंघाने निर्बंध लादल्यावर लुकाशेंको यांनी रशियाच्या कळपात शिरण्याचे पाऊल उचलले होते. परंतु सद्यकाळात ते रशियावर नाराज आहेत. त्यांनी रशियावर निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.
रशियाची भूमिका
बेलारुसने 33 रशियन नागरिकांना अटक केली आहे. विरोधी पक्षांच्या मदतीने देशात अस्थिरता फैलावण्याचा आरोप प्रशासनाने या रशियन नागरिकांवर ठेवला आहे. हे नागरिक बेलारुसमार्गे तुर्कस्तानात जात होते असे म्हणत रशियाने हा आरोप फेटाळून लावला आहे.