ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये नाही तर नोव्हेंबरमध्ये युरोपात आढळला आहे, असा दावा ईशान्य फ्रान्सच्या कॉलमार येथील अल्बर्ट श्वित्झर रुग्णालयाचे डॉक्टर मायकल श्मिट यांच्या टीमने केला आहे.
श्मिट यांच्या टीमने केलेल्या दाव्यानुसार, 16 नोव्हेंबर 2019 मध्येच युरोपात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला नसावा. नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये अल्बर्ट श्वित्झर रुग्णालयात करण्यात आलेल्या फ्लूशी संबंधित 2500 लोकांचे एक्सरे रिपोर्ट तपासून त्याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये नोव्हेंबर महिन्यातील दोन रिपोर्ट्समध्ये कोरोना व्हायरसची पुष्टी स्पष्टपणे झाली आहे.
16 नोव्हेंबरला एका रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यावेळी त्याचा एक्सरे काढण्यात आला होता. दुसऱ्या दिवशीही या व्यक्तीची टेस्ट करण्यात आली. मात्र, तो कोरोना आहे याबद्दलची तेव्हा माहिती नव्हती. डिसेंबरमधील रुग्णांच्या एक्सरेच्या पाहणीवरून 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यामध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती.
युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटनच्या ग्लोबल हेल्थ एक्सपर्ट्स आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टरविन गुप्ता यांनीही या दाव्यांचा आणि एक्सरे रिपोर्ट्सचा अभ्यास केला. त्यांच्या मते एक्सरेमध्ये दिसत असलेल्या फुफ्फुसात कोरोना संक्रमणामुळे बदल होतो तसा बदल झालेला आहे. मात्र, सर्वच एक्सरे रिपोर्ट्समध्ये असे दिसून येत नाही.