रद्द विश्व बॅडमिंटन फेडरेशनचा निर्णय
नवी दिल्ली
कोव्हिड 19 महामारीच्या कारणास्तव विश्व बॅडमिंटन फेडरेशनने आणखी दोन स्पर्धा रद्द केल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यात स्विस ओपन व युरोपियन चॅम्पियनशिप्स या स्पर्धांचा समावेश असून त्याच्या आयोजनासाठी योग्य तारखा उपलब्ध होऊ शकत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
‘बॅडमिंटनमधील काही स्पर्धांच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून योग्य तारखा न मिळाल्याने स्विस ओपन व युरोपियन चॅम्पियनशिप्स या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. याआधी त्या लांबणीवर टाकण्यात आल्याचे व योग्य तारखा मिळाल्यानंतर आयोजित करण्याचे जाहीर करण्यात आले होते,’ असे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने सांगितले. स्विस ओपन ही सुपर 300 स्पर्धा असून 17 ते 22 मार्च या कालावधीत ती घेतली जाणार होती. पण कोरोनाच्या प्रकोपामुळे ती लांबणीवर टाकण्यात आली होती. स्विस बॅडमिंटन व स्पर्धा आयोजक यांच्याशी चर्चा करून ही स्पर्धा भरविता येणे शक्य नसल्याचे आढळल्यानंतर ती रद्द करण्याचे ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी या स्पर्धेत चीनच्या शि युकीने जेतेपद व भारताच्या बी. साई प्रणीतने उपविजेतेपद मिळविले होते.
युरोपियन चॅम्पियनशिप्स स्पर्धा 21-26 एप्रिल या कालावधीत होणार होती. ती देखील लांबणीवर टाकण्यात आली होती. पण आता ती स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. युक्रेनमधील कीव्ह येथे ही स्पर्धा होणार होती. बॅडमिंटन युरोप व युक्रेन बॅडमिंटन फेडरेशन यांनी चर्चा करून ती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. युक्रेनने पुढील वर्षीची स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता दिली असून 27 एप्रिल ते 2 मे या कालावधीत ती घेतली जाईल. पुढील वर्षीचे पहिले 17 आठवडे ऑलिम्पिक पात्रतेसाठी ठेवण्यात आले असल्याने या दोन्ही स्पर्धांना ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.