वृत्तसंस्था/ ओसजेक (क्रोएशिया)
सोमवारपासून येथे युरोपियन नेमबाजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया भारताच्या 8 नेमबाजांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची राहील. या स्पर्धेत भारतीय नेमबाज मिनीमम क्वालीफिकेशन स्कोअरमध्ये (एमक्यूएस विभागात) भाग घेणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीची दखल अंतिम फेरीसाठी पात्रतेची ठरविली जाणार नाही.
भारतीय नेमबाजांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वीची ही महत्त्वाची सरावाची स्पर्धा आहे. युरोपियन नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज दीपककुमार, पनवार आणि ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर हे पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल एमक्यूएसमध्ये नेमबाजी करणार असून याप्रकारात अन्य 12 नेमबाजांचा समावेश आहे. महिलांच्या 10 मी. एअर रायफल एमक्यूएसमध्ये भारताच्या अपूर्वी चंडेला आणि इलावेनिल वलरिवन व अन्य 12 महिला नेमबाज नेमबाजी करतील. भारताचा अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांची पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत चाचणी होईल. या प्रकारात अन्य देशांचे 9 नेमबाज भाग घेतील. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या मनू भाकर, यशस्वीनी सिंग देसवाल यांच्यासह अन्य 6 स्पर्धक भाग घेतील.
टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया 13 जणांचा भारतीय नेमबाज संघ क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथे शनिवारी दाखल झाला. भारताची महिला नेमबाज अंजूम मोदगील या स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर रायफल आणि 50 मी. रायफल 3 पोझिशन अशा दोन वैयक्तिक प्रकारात भाग घेणार आहेत. 22 जून पासून ओसजेक येथे विश्वचषक रायफल, पिस्तुल, शॉटगन नेमबाजी स्पर्धा होणार आहे. आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारताच्या एकूण 15 नेमबाजांनी आपली पात्र सिद्ध केली आहे. स्किट नेमबाज मिराज खान आणि बजवा यांनीही टोकियो ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले असून ते आता इटलीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.