रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 23 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. युद्धाची धग आणखी तीव्र होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युरोपियन स्पेस एजन्सीने रशियन स्पेस एजन्सीला 8433 कोटी रुपयांच्या मंगळ मोहिमेतून बाहेर काढले आहे. आता या मोहिमेत रशियन शास्त्रज्ञ आणि अभियंते यांची मदत घेतली जाणार नाही.
युरोपियन स्पेस एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, एक्सोमार्स मोहीम या वषी सप्टेंबरमध्ये सुरू होणार होती, त्यासाठी रशियन प्रक्षेपकातून रोव्हर मंगळावर पाठवले जाणार होते. ते मंगळावरील मातीचा अभ्यास करून तेथील जीवनाच्या खुणा शोधणार होते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याने नाव घेत नाही. त्यामुळे युरोपियन स्पेस एजन्सीने या मोहिमेतून रशियाला बाहेर काढले आहे. त्यामुळे पूर्वनियोजित वेळेला हे लाँचिंग होणार नाही. रोव्हरच्या लाँचिंगबाबत पुन्हा नियोजन करण्यात येईल.
रशियाला या मोहिमेतून बाहेर काढल्यामुळे रोव्हर मंगळावर कसे नेले जाईल, याचा शास्त्रज्ञ आभ्यास करत आहेत. यासाठी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेशी बोलणे सुरू आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.