बैठकीत सादर सैन्य समीकरणाचा मसुदा लीक – डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया अन् स्वीडनचा विरोध
वृत्तसंस्था / ब्रसेल्स
बेलारुस आणि पोलंड यांच्यातील सीमा वादामुळे युरोपमध्ये नवी सैन्य समीकरणे तयार होत आहेत. युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांदरम्यान मागील आठवडय़ात झालेल्या बैठकीत संयुक्त सैन्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. लीक झालेल्या या प्रस्तावानुसार युरोपीय महासंघाच्या देशांनी स्वतःच्या सैन्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बदलती जागतिक समीकरणे आणि रशियाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आता सैन्य स्वरुपात आत्मनिर्भरतेची वेळ आली असल्याचे युरोपीय महासंघाचे मानणे आहे. अफगाणिस्तानातून युरोपीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांदरम्यान अनेक अडचणी आल्या होत्या.
संयुक्त सैन्यासाठी युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना अर्थसंकल्पातही वाढ करावी लागणार आहे. पण महासंघाचे सदस्य देश डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया आणि स्वीडन या प्रस्तावाबद्दल उत्साही नाहीत. यापूर्वी युरोपीय महासंघाकडून कोरोनाविरोधी लढय़ासाठी निर्माण करण्यात आलेल्या निधीत या देशांनी सहकार्य केले नव्हते.
सुरक्षेत आत्मनिर्भरता
बेलारुस आणि पोलंड सीमा वादामुळे युरोपीय महासंघाचा सदस्य असलेल्या असलेल्या पोलंडला सुरक्षेसाठी नाटो आणि अमेरिकेवर निर्भर रहावे लागत आहे. अमेरिकेने पोलंडला अतिरिक्त सुरक्षा पुरविली आहे. आगामी काळात जर कुठल्या अन्य देशाला गरज भासल्यास संयुक्त सैन्य उपयुक्त ठरणार असल्याचे युरोपीय महासंघाचे मानणे आहे.
गुप्त माहितींचे आदान-प्रदान
प्रस्तावानुसार युरोपीय महासंघाच्या सर्व 27 देशांच्या सैनिकांना संयुक्त सैन्यात सामील केले जाणार नाही. काही देशांचेच सैनिक सामील करण्याचा प्रस्ताव आहे. अधिकृतस्वरुपात युरोपीय महासंघाच्या संयुक्त सैन्यासाठी सर्व देशांकडून मंजुरी मिळवावी लागणार आहे. त्यानंतर संयुक्त सैन्याची निर्मिती होऊ शकेल.
मार्चमध्ये मंजुरी शक्य
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन युरोपीय महासंघाच्या संयुक्त सैन्याचे सर्वात मोठे समर्थक आहेत. पुढील वर्षी मार्च महिन्यात युरोपीय महासंघाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असणार आहे. संयुक्त सैन्यामुळे युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांची नाटोवरील निर्भरता कमी होणार असल्याचे मॅक्रॉन यांचे स्पष्ट मानणे आहे. पोलंड एस्टोनिया आणि लिथुआनिया हे संयुक्त सैन्याचे समर्थक आहेत.
युरोपीय महासंघात नवे समीकरण
-27 सदस्य देश असलेल्या युरोपीय महासंघाच्या बैठकीत मांडण्यात आला संयुक्त सैन्याचा प्रस्ताव
-60 हजार सैनिकांच्या संयुक्त सैन्याचा प्रस्ताव, काही काळामध्ये प्रस्तावाला अंतिम मंजुरी शक्य
-5 हजार सैनिक पहिल्या टप्प्यात बेलारुसला लागून असलेल्या पोलंडच्या सीमेवर तैनात होणार