पहिल्या लढतीत डेन्मार्क-वेल्स आमनेसामने भिडणार, दोन्ही संघात थरारक लढतीची अपेक्षा, बाद फेरीत प्रथमच परस्परांची ताकद आजमावणार
वृत्तसंस्था /ऍमस्टरडम
युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीला प्रारंभ होत असून आज (शनिवार दि. 26) पहिल्या लढतीत डेन्मार्क-वेल्सचे संघ आमनेसामने भिडणार आहेत. या दोन्ही संघांनी एखाद्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील बाद फेरीत एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 9.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
एकीकडे, वेल्सने आपल्या दुसऱया युरो मोहिमेत सलग बाद फेरी गाठण्यात यश प्राप्त केले आहे तर दुसरीकडे, डेन्मार्कचा संघ 17 वर्षांनंतर प्रथमच बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. साखळी फेरीअखेर या दोन्ही संघांनी गोल डिफरन्सच्या निकषावर आपापल्या गटात दुसरे स्थान संपादन केले होते. वेल्सचा संघ 4 गुणांसह अ गटात इटलीपाठोपाठ दुसऱया स्थानी राहिला तर डेन्मार्कचा संघ साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने हरुन देखील बाद फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यांनी रशियाचा एकतर्फी धोबीपछाड करत हा पराक्रम गाजवला. ब गटात ते बेल्जियमपाठोपाठ दुसऱया स्थानी राहिले. या सामन्यातील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्स व झेक प्रजासत्ताक यांच्यातील विजयी संघाशी लढेल. ही लढत 3 जुलै रोजी बाकू येथे होणार आहे.
आजवर डेन्मार्क सरस
डेन्मार्क-वेल्स यांच्यात यापूर्वी झालेल्या मागील 10 लढतीत डेन्मार्कने 6 तर वेल्सने 4 विजय नोंदवले आहेत. दोन्ही संघात 2018 साली शेवटची लढत झाली, त्यात डेन्मार्कने विजय संपादन केला. योगायोग म्हणजे यंदा पहिल्या सामन्यात मैदानावर कोसळलेल्या ख्रिस्तियन एरिक्सनने त्या लढतीत 2 गोल केले होते. याशिवाय, या दोन संघात नोव्हेंबर 2008 मध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली, त्यात क्रेग बेल्लॅमीने सामन्यातील एकमेव गोल करत वेल्सला विजय संपादन करुन दिला होता.
वेल्सने युरो स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी 1976 च्या आवृत्तीत नोंदवली असून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. युगोस्लाव्हियाने त्यांना 1-3 अशा ऍग्रिगेट फरकाने नमवले. युगोस्लाव्हियाने पहिल्या फेरीतील लढतीत 2-0 अशी बाजी मारली तर दुसरी फेरी 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.
सध्या रॉबर्ट पेज यांचे प्रशिक्षण लाभत असलेल्या वेल्सने स्वित्झर्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. मात्र, तुर्कीविरुद्ध त्यांना 0-2 फरकाने पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. रोममध्ये झालेल्या तिसऱया सामन्यात इटलीविरुद्ध 0-1 पराभव पत्करावा लागला असला तरी यानंतरही अंतिम 16 मध्ये स्थान संपादन करता आल्याने ते सुदैवी ठरले. वेल्सचा नेदरलँडस् भूमीतील अनुभव मात्र अजिबात चांगला नाही. वेल्सने आतापर्यंत तेथे 5 सामने खेळले असून सर्व लढतीत त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. यादरम्यान त्यांनी 16 गोल पत्करले.
डेन्मार्कसाठी नववी युरो स्पर्धा
डेन्मार्क संघासाठी ही नववी युरो स्पर्धा आहे. मात्र, मागील 4 आवृत्तीत ते दोनवेळा बाद फेरीत पोहोचू शकले आहेत. 2012 मध्ये त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. आपल्या गटात ते जर्मनी व पोर्तुगाल यांच्यानंतर तिसऱया स्थानी फेकले गेले. त्यावेळी त्यांना 3 सामन्यात 3 गुण मिळवता आले होते. 2016 युरो स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये डेन्मार्कला स्कॅन्डिनेव्हियन शेजारी स्वीडनकडून 4-3 ऍग्रिगेट फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
डेन्मार्कचा संघ 1992 मध्ये मात्र युरो स्पर्धेत विजेता ठरला. त्यांनी 1964 मध्ये चौथे स्थान मिळवले तर 1984 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. 2004 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत त्यांना झेक प्रजासत्ताकविरुद्ध 0-3 फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
डॅनिश संघाने यंदा ड गटात दुसरे स्थान मिळवत बाद फेरीतील स्थान निश्चित केले. ते 8 क्वॉलिफायर लढतीत अपराजित देखील राहिले. या 8 लढतीत त्यांची कामगिरी 4 विजय व 4 बरोबरी अशी राहिली. डेन्मार्कचे यंदा साखळी फेरीतील तीनही सामने कोपनहेगनमध्ये झाले. त्यांना फिनलंडविरुद्ध 0-1, बेल्जियमविरुद्ध 1-2 अशा फरकाने पराभव पत्करावे लागले. मात्र, तिसऱया व शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी रशियाचा 4-1 असा एकतर्फी धुव्वा उडवत गटात दुसरे स्थान निश्चित केले.
रशियाविरुद्ध विजय मिळवताना त्यांनी युरो स्पर्धेतील सलग 4 पराभवांची मालिका देखील खंडित केली. युरो बाद फेरीच्या इतिहासात 13 सामन्यातील हा त्यांचा केवळ तिसरा विजय देखील ठरला आहे.
इटली-ऑस्ट्रिया यांच्यातही आज जोरदार रस्सीखेच अपेक्षित
लंडन ::अंतिम 16 संघातील आणखी एका लढतीत आज इटली व ऑस्ट्रिया यांच्यातही जोरदार रस्सीखेच रंगण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट 2008 नंतर हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने भिडत आहेत, हे या लढतीचे ठळक वैशिष्टय़ असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, वेम्बले स्टेडियमवर रात्री 12.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
13 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण लढतीत हे संघ आमनेसामने भिडले, त्यावेळी ती लढत 2-2 अशी बरोबरीत राहिली होती. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये झालेल्या चारही लढती इटलीने जिंकल्या असून तोच कित्ता येथेही गिरवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
युरो स्पर्धेतील 14 बाद फेरीतील सामन्यात इटलीने 7 सामने निर्धारित वेळेत बरोबरीत सोडवले आहेत. या 7 ड्रॉ लढतीनंतर त्यांना 2 विजय संपादन करता आले आणि 3 वेळा पेनल्टी शूटआऊटवर हार पत्करावी लागली. इटलीचा संघ सध्या 30 सामन्यांपासून अपराजित असून यात 25 विजय व 5 बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रियाचा संघ युरो स्पर्धेत बाद फेरीत प्रथमच खेळणार आहे. अगदी विश्वचषक स्पर्धेतही 1954 नंतर प्रथमच त्यांना एखादा नॉकआऊट सामना खेळण्याची संधी मिळेल. 1954 विश्वचषकात या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रिया संघाने लंडनमध्ये आजवर खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यात पराभव पत्करावे लागले. उर्वरित 2 सामन्यात त्यांची कामगिरी 1 विजय व 1 बरोबरी अशी आहे.