वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कोरोना व्हायरस महामारीमुळे युरोपियन चॅम्पियन्सशीप फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. युरो 2020 फुटबॉल स्पर्धेतील प्ले ऑफ लढती येत्या ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील, अशी आशा युफाचे उपाध्यक्ष कॅसेनी यांनी व्यक्त केली आहे.
या स्पर्धेतील प्ले ऑफ लढतीनंतरच शेवटचे चार संघ निश्चित होतील. सदर स्पर्धेतील प्ले ऑफ लढती 16 संघामध्ये होणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे युरो फुटबॉल स्पर्धेतील प्ले ऑफ लढती यापूर्वी दोनवेळा लांबणीवर टाकण्यात आल्या असून आता 2020 ची युरो चषक फुटबॉल स्पर्धा एक वर्षांने लांबणीवर घेतली जाईल. सदर स्पर्धा आता 2021 साली खेळविली जाईल.