व्हेनेझुएलाच्या युलिमर रोजसने रविवारी आपल्या शेवटच्या प्रयत्नात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि महिला तिहेरी उडीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. रोजसने आपल्या शेवटच्या 6 प्रयत्नांमध्ये एकदा 15.67 मीटर्सचा मार्क सर केला, त्याचवेळी तिचे सुवर्ण जवळपास निश्चित झाले होते. तिने यावेळी 1995 मधील विक्रम मोडीत काढला. युक्रेनच्या इनेस्सा क्रॅव्हेट्सच्या खात्यावर यापूर्वी 15.50 मीटर्स उडीचा विक्रम नोंद होता.
रोजसने आपल्या शेवटच्या प्रयत्नात 15.39 मीटर्सचा ऑलिम्पिक विक्रम मोडला. दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या रोजसने यापूर्वी 2016 रिओ डे जानेरिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले होते. रविवारी रोजसनंतर पोर्तुगालच्या पॅट्रिसिया मॅमोनाने 15.01 मीटर्सच्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्य तर स्पेनच्या ऍना पेलेटेरिओने 14.87 मीटर्सच्या राष्ट्रीय विक्रमासह कांस्यपदक संपादन केले.