निवृत्त कर्नल पी. व्ही. रामनाथकर यांचे प्रतिपादन : उचगाव येथे शहीद जवान राहुल सुळगेकर पुतळा अनावरण समारंभ
वार्ताहर / उचगाव
उचगाव गावचा एक जवान भारतमातेची सेवा बजावता बजावता शहीद झाला. असे हजारो जवान देशरक्षणासाठी उचगावने द्यावेत, यासाठी युवकांनी मोठय़ा संख्येने लष्करात भरती व्हावे, देशसेवेला वाहून घ्यावे. मला जर पुनर्जन्म मिळाला तर मी पुनः पुन्हा सैन्यात देशसेवेसाठीच जन्म घेईन, असे मौलिक विचार निवृत्त कर्नल पी. व्ही. रामनाथकर यांनी मांडले.
उचगावचे सुपुत्र शहीद राहुल भैरु सुळगेकर यांना जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत गोळी लागून 2019 मध्ये वीरमरण आले. त्यांच्या पुतळय़ाचा अनावरण समारंभ उचगाव येथील शहीद राहुल सुळगेकर नगरीत बुधवार दि. 24 रोजी पार पडला. या पुतळा अनावरणप्रसंगी निवृत्त कर्नल पी. व्ही. रामनाथकर उद्घाटक या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार होते. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट कर्नल पंकज गुप्ता, बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव ग्रामीण सीपीआय राघवेंद्र हळ्ळूर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, ता. पं. सदस्या व उचगाव ग्रा. पं. उपाध्यक्षा मथुरा तेरसे, एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले, बाळकृष्ण तेरसे, बंटी पावशे, उमेश बुवा, गजानन नाईक, यादो कांबळे, सूरज सुतार, दत्तात्रय बेनके, मोनाप्पा पाटील, योगिता देसाई, अंजना जाधव, नागरत्ना कोरडे, रुपाली गिरी, लक्ष्मी कुराडे, अनसुया कोलकार, रुपा गोंधळी, माधुरी पाटील, अमृता बंकापूर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत राहुलचे वडील भैरु सुळगेकर, मयूर सुळगेकर व गीता सुळगेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन जावेद जमादार, सरस्वती पाटील, मथुरा तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. शहीद राहुल सुळगेकर यांच्या पुतळय़ाचे अनावरण पी. व्ही. रामनाथकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘बोलो भारतमाता की जय’, ‘अमर रहे अमर रहे, हुतात्मा राहुल अमर रहे’ अशा घोषणांनी राहुल सुळगेकरनगरी दुमदुमली होती.
राहुल शहीद होऊन एक वर्षाचा काळ लोटला. मात्र, शासनाने सुळगेकर कुटुंबीयांना मदत देण्याच्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केली नसल्याची खंत रमाकांत कोंडुस्कर यांनी बोलून दाखविली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासनामार्फत पाच एकर जागा देण्यासाठी मी प्रयत्न करत असून ती नक्की मिळवून देण्याचे आश्वासन या समारंभात त्यांनी दिले. सरस्वती पाटील बोलताना म्हणाल्या की, राहुलने देशरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे. ते वाया जाऊ नये, सातत्याने देशरक्षणासाठी आपणही मदत करुया.
या कार्यक्रमाला उचगाव पंचक्रोशीतील नागरिक तसेच मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान, आजी-माजी जवान, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले. मयुर सुळगेकर यांनी आभार मानले.