युवक राष्ट्रवादी काँग्रेस मेळ्याचे उद्घाटन ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा अचानक रद्द
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे शिबिर होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. ज्या संघटनेत युवकांची मजबूत फळी असते, ती संघटना मजबूत बनते. युवकांनी जिद्दीने काम करून संघटना बांधणीत मनापासून काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. सरकार करत असलेल्या लोकाभिमुख कामांचे व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम युवकांनी करावे, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
महाबळेश्वर येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण (केडर कॅम्प) शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्याक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होते, मात्र अजित पवार यांचा दौरा अचानक रद्द झाला.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निमंत्रित प्रमुख पदाधिकाऱयांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील हॉटेल ड्रिमलँडच्या भव्य प्रांगणामध्ये करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवक पदाधिकाऱयांना मार्गदर्शन, संवाद आणि मंथन यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या केडर कॅम्पला ‘चेतना नव्या युगाची नव्या विचारांची प्रगतशील महाराष्ट्राची’ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून या भव्य कार्यक्रमाची तयारी गेली काही दिवस सुरु होती. या केडर कॅम्पचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थितीत असणार होती. मात्र उपमुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द झाला, हा दौरा हा खराब वातावरणामुळे रद्द झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. खा श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ मकरंद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडले. या शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमास सातारा जिह्यातील नेत्यांनी देखील पाठ फिरवल्याने मोजक्या मान्यवराच्या उपस्थितीत उदघाटन समारंभ आटोपण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तर आभार कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी मानले. या केडर कॅम्पच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसेवक प्रकाश पाटील, शहराध्यक्ष रोहित ढेबे, प्रवीण भिलारे, ऍड संजय जंगम, दानिश मुलाणी, संदीप मोरे, सचिन ढेबे, अनिकेत रिंगे, तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपास्थीत होते.