छत्तीसगडमध्ये धक्कादायक घटना ः युवकाचा मोबाईलही तोडला
वृत्तसंस्था / रायपूर
लॉकडाउनदरम्यान कोरोना चाचणी आणि सेवेसाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना मारहाण करणारे सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. देशभरात फजिती झाल्यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रविवारी सकाळी शर्मा यांना जिल्हाधिकारी पदावरून हटविण्याचा निर्देश दिला आहे. सुरजपूर जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांच्याकडून एका युवकासोबत झालेल्या गैरवर्तनाची घटना अत्यंत दुःखद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशाप्रकारचे कृत्य सहन केले जाणार नसल्याचे बघेल यांनी म्हटले आहे.
या मारहाणीची चित्रफित व्हायरल झाली आहे. जिल्हाधिकारी पोलिसांना युवकाकडून होत असलेल्या चित्रिकरणानंतर कारवाईची सूचना करतात. पोलिसांनी जिल्हाधिकाऱयांसमोरच युवकाला मारहाण सुरू केली. जिल्हाधिकाऱयांनीही युवकाचा मोबाइल आपटून तोडून टाकला. तसेच जिल्हाधिकाऱयांनी त्याला थप्पड लगावली आहे. देवाशपथ मी कोरोनाची चाचणी करवून येत आहे असे युवक सांगत असतानाही जिल्हाधिकारी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात यावा असे सांगत असल्याचे चित्रफितीत दिसून येते. याचबरोबर अन्य लोकांनाही त्यांच्या रागाला बळी पडावे लागले आहे.
मागितली माफी
शर्मा यांनी सर्वप्रथम चित्रफित एडिटेड असल्याचा दावा करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण शनिवारी रात्री उशिरा स्वतः व्हिडिओ तयार करत माफी मागितली आहे. सूरजपूर जिल्हय़ातील स्थिती खराब असून माझे आईवडिल कोरानाबाधित आढळले होते. मी कोरोना पॉझिटिव्ह नसलो तरी माझी आई सध्या कोरोनाबाधित आहे. यातूनच भावनेच्या ओघात माझ्या हातून हे कृत्य घडल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त पार्श्वभूमी
2012 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी रणवीर शर्मा यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. तसेच त्यांनी एका अस्वलावर गोळय़ा झाडण्याचा आदेश दिला होता. त्यांच्या आदेशामुळे अस्वलावर 11 गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी वन विभागाकडून चौकशी करण्यात आली होती.