इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील कुख्यात बाबर गॅंगचा म्होरक्या सुदर्शन बाबर याला पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी आणि त्यांच्या पथकाने एका खून प्रकरणी शनिवारी पहाटे अटक केली. तो काही महिन्यांपूर्वी मोक्क्याच्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आला होता. गुंड बाबर आणि त्याच्या साथीदारांनी एक महिन्यांपूर्वी शहरातील जवाहर नगरातील संतोष उर्फ पप्पू जाधव या युवकाचा पूर्वनियोजित खुन केला होता. या युवकाच्या खुनाचा मास्टरमाइंड गुंड बाबरच असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संतोष उर्फ पप्पू जाधव याचा गेल्या महिन्यात पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेनंतर संतप्त जमावाकडून संशयित आरोपींची वाहने, घरे फोडून काही घरांना आग लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन बाबर व त्याच्या गँगमधील गुंड शुभम काणे, निखिल माने, विपुल नाईक (सर्व रा. जवाहर नगर, इचलकरंजी) आणि अभिषेक असाल (रा. वखार भाग, इचलकरंजी) यांच्यासह ८ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, कपडे, हत्यारे व अन्य वस्तू पोलिसांनी जप्त केले आहे.
अटक केलेल्या काणेसह त्याच्या साथीदारांकडे पोलिसांनी जाधव यांच्या खुनाचा मुख्य मास्टरमाइंड कोण आहे, याचा कसून चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान, त्याच्याकडून खुनाचा मुख्य मास्टरमाइंड बाबर टोळीचा म्होरक्या सुदर्शन बाबर असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक बाबुराव महामुनी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या पथकाने गुंड बाबर याचा शोध सुरू केला. याच दरम्यान तो गडहिंग्लज तालुक्यातील एका गावातील हॉटेलमध्ये आसरा घेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकून शनिवारी पहाटे त्याच्या मुसक्या आवळल्या.