उद्यमबाग पोलिसांची कारवाई : कुऱहाड, तलवारी, कोयता जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
आंबेडकर गल्ली-मजगाव येथील युवकाच्या खूनप्रकरणी त्याच गावातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उद्यमबाग पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत. एका महिलेला त्रास दिल्याच्या रागातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सरदारगौडा मुत्तत्ती, पोलीस उपनिरीक्षक बी. आर. डुग, रमेश अक्की, आय. एस. पाटील, महेश पाटील, आर. एस. पुजारी, ए. एम. कांबळे, अजित शिप्पुरे, जगदीश हादीमनी, भरमा करिगार, श्रीधर तळवार, ईराण्णा चवलगी, शिवकुमार कर्की व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
संदीप राजू कोलकार (वय 32), कुमार संतोष राजंगळी (वय 19), रवी गंगाप्पा गुळेदकोप्प (वय 25), प्रदीप निंगाप्पा कोलकार (वय 24), शिवकुमार चंद्रकांत माने (वय 22, सर्व रा. आंबेडकर गल्ली, कलमेश्वरनगर, मजगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
त्यांच्याजवळून खुनासाठी वापरण्यात आलेली कुऱहाड, तलवार, चाकू, कोयता व एक ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली आहे. 30 जूनच्या सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव येथील आदिनाथ भवनजवळ यल्लेशाप्पा शिवाजी कोलकार (वय 37, रा. मजगाव) या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. खून करून त्याचा मृतदेह भररस्त्यात टाकून देण्यात आला होता.
12 तासांत पोलिसांनी लावला खून प्रकरणाचा छडा
यल्लेशाप्पाच्या बहिणीने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. केवळ 12 तासांत पोलिसांनी खून प्रकरणाचा छडा लावला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील एका आरोपीच्या बहिणीला त्रास दिल्याच्या रागातून यल्लेशाप्पाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.