कोडार येथील घटना, फोंडा पोलिसांचा निषेध : वाळपईचे दोघे पोलीस कॉन्स्टेबल निलंबित
प्रतिनिधी / फोंडा
कोडार-बेतोडा येथे रंगपंचमी साजरी करीत असताना युवकाच्या गटाला अमानुषपणे दंडुक्याने मारहाण करणाऱया दोघा कॉन्स्टेबलना निलबिंत करण्यात आले आहे. रामा खाणेकर (बक्कल नं. 7506) व ओंकार माणकर (बक्कल नं. 7498) दोघेही राहणारे वाळपई अशी त्याची नावे आहेत. सदर घटना शुक्रवार 18 रोजी घडली होती. यावेळी महेश मोहनलाल जयस्वाल (26, कुर्टी फोंडा) याला पोलिसांनी बेदम मारहाण करून जखमी केले होते.
कोडार नदीस्थळाजवळ होळीनिमित्त काही युवक आनंदोत्सव साजरा करताना साध्या गणवेशातील पोलिसांनी युवकाना हटकल्यानंतर कोणताच प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर पोलीस व युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नेमका तोच राग मनात बाळगून फोंडा पोलिसांनी आपला इंगा दाखविताना खाकी वर्दी घालून घटनास्थळावर हजर झाले. त्यानंतर युवकांना दंडुक्यांनी यथेच्छ चोप दिल्याची घटना उघडकीस आली होती. युवकांच्या पाठीवर दंडुक्याची व्रण दिसत असलेली क्लीप सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांना दखल घ्यावीच लागली. त्यापूर्वी फोंडा पोलीस स्थनाकातील पोलीस सदरप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत होते. असे काही घडलेच नसल्याचा कांगवा करीत होते. सोशलमीडियामुळे पोलिसांचे कारनामे उघड होऊ लागले आहे. कुंडई येथे घडलेल्या घटनेनंतर फोंडा पोलिसांच्या कृतीचा ग्रामस्थांनी निषेध केला होता. कालच्या घटनेनंतर राज्यभरातून पोलिसांच्या या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.
याप्रकरणी दोघां संशयितावर भा.दं.सं. 324, 504 व 34 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आलेला असून दोघांचीही पोलीस खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक साजिद पिल्ले अधिक तपास करीत आहे.