मैत्रिणीबरोबरचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : अगोदर 70 हजार उकळले : दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सातारा
एका युवकाचे त्याच्या मैत्रीणीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्यांच्यात झालेल्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ चित्रण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन युवकाकडून एका महिलेसह तिच्या दुसऱया पतीच्या सहकार्याने 70 हजार रुपये उकळले. त्यानंतर युवकास व त्याच्या मैत्रीणीस पुन्हा धमक्या देत त्यांना 4 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालीय. याप्रकरणी एका महिलेसह एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार 26 वर्षीय युवकाचे एका युवतीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याची माहिती असलेल्या जयश्री दिलीप पवार या महिलेने त्यांना तिच्या घरात फ्रीडम दिले. त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले त्यावेळी जयश्री पवार व तिचा दुसरा पती आनंद शिंदे (दोघे रा. अहिरे कॉलनी, अंकुर हॉस्पिटलशेजारी, सातारा) यांनी त्याचे व्हिडिओ चित्रण केले होते. दि. 16 जुलै रोजी ही घटना घडली होती.
त्यावेळी त्या युवकाला वेळोवेळी फोन करुन पैशाची मागणी केली तसेच हे चित्रण दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून जयश्री पवार व आनंद शिंदे यांनी 70 हजार रुपये उकळले. यानंतर देखील या दोघांनी सातत्याने युवकासह त्याच्या मैत्रिणीला पैशाची मागणी सुरुच ठेवली. संबंधित व्हिडिओ चित्रण व्हायरल करण्याची पुन्हा धमकी देत त्यांनी दोघांना चार लाख रुपये मागितले.
त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या युवकाने शेवटी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत जयश्री पवार व आनंद शिंदे यांच्या विरुध्द ब्लॅकमेलिंग करत 4 लाख रुपयांची मागणी असल्याची तक्रार दि. 6 रोजी दिली. या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.
ओळखीचा असाही गैरफायदा
युवकाला व त्याच्या मैत्रिणीला ही महिला व तिचा दुसरा पती वारंवार फोनवरुन पैसे मागत होते. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने युवती घाबरुन गेली होती. वास्तविक ती महिला दोघांच्याही ओळखीची होती पण पैशासाठी तिने हा मार्ग स्वीकारत युवक व त्याच्या मैत्रिणीला सतत तणावाखाली ठेवले. शेवटी तर चार लाख रुपये मागितल्याने युवकाने त्याच्या घरच्यांना हा प्रकार सांगत पोलीस ठाणे गाठले.