प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा व सत्र न्यायालयाने वड्डवाडी (ता. करवीर) येथील ईश्वर कल्लाप्पा नाईक या युवकास बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी धरले. त्याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये (पोस्को) दहा वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी शिक्षा ठोठाविली. ही शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी सुनावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून राजेश चव्हाण यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी ईश्वर नाईक याने दहा वर्षीय बालिकेवर लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी पिडीतेच्या आईने त्याच्या विरोधी करवीर पोलिसात तक्रार दाखल केली होती. याची गांभीर्याने दखल घेवून या पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. रणवरे यांनी आरोपीला जेरबंद केले. त्याच्याविरोधी बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये (पोस्को) व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गुह्याचा तपास करुन त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्या विरोधी दोषरोपत्र दाखल केले. या बाल लैंगिक अत्याचार खटल्याची जिल्हा व सत्र न्यायालयात गेली तीन वर्षे सुनावणी सुरु होती. या सुनावणीत सरकार पक्षातर्फे 12 साक्षिदार तपासण्यात आले. या साथिदारामधील पिडीत बालिका व सर्व साक्षिदारांच्या साक्षी महत्वपूर्ण झाल्या. तसेच सरकारी वकील राजेश चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी आरोपी नाईक याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये (पोस्को) दोषी धरले. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांची साधी शिक्षा ठोठाविली.