सातारा तालुका डीबीची कामगिरी : तिघांमध्ये एक अल्पवयीन : हत्यार, चोरीची रक्कम, मोबाईल हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
येथील वाढे फाटा परिसरात एका कॉलेज युवकास चाकूचा धाक दाखवून, मारहाण करुन लुटणाऱया तीन चोरटय़ांना सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱयांनी गुन्हा घडल्यानंतर केवळ दोन तासात ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या पैकी एक अल्पवयीन असून त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. करण अनिल लादे (वय 21) आणि अक्षय राजेंद्र चव्हाण (वय 20, दोघेही रा. कोयना सोसायटी, सदरबझार, सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा येथे रात्रीच्या सुमारास सेवा रस्त्यावर एक कॉलेज युवक आकाश शंकर चौगुले (रा. मंगळवार पेठ, सातारा) हा थांबला असताना त्याठिकाणी चार अनोळखी युवक आले. त्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याच्याकडून 1 हजार 350 रुपये रोख व त्याचा मोबाईल घेऊन ते पळून गेले होते.
याबाबत आकाश चौगुले याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या.
या गुह्याची कौशल्यपूर्वक माहिती प्राप्त करून पथकाने केवळ दोन तासात या गुन्हय़ाचा छडा लावला आहे. याप्रकरणी एका युवकास ताब्यात घेतले असता त्याने अन्य तीन साथीदारांना समवेत हा गुन्हा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर अन्य दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. कारवाईत पोलीस हवालदार दादा परिहार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन थोरात, सागर निकम, उदयसिंह पावरा यांनी सहभाग घेतला.