प्रतिनिधी / सातारा :
नव्या युगातील वाटचाल करताना शिरवळसारख्या निमशहरी ठिकाणी समर्थ कृपा इन्स्टिटयूटने युवतींसाठी फॅशन डिझाईनिंग, ब्युटिशियन, ऍक्टिंग, डान्स आणि जर्नालिझम सारखे कोर्सेस उपलब्ध केले आहेत. युवतींनी नव्या युवकाची आव्हाने स्वीकारताना या नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
शिरवळ, ता. खंडाळा येथील श्री समर्थ कृपा इन्स्टिटय़ूटचे उद्घाटन खासदार पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार पाटील यांनी त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण शैलीत त्यांच्या कॉलेज जीवनापासून ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास कथन केला. जीवनात कोणतीही कला अंगी असलीच पाहिजे असे सांगून त्यांनी रोहिणी साळुंखे यांनी युवतींसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून, युवतींनी या विविध कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
यावेळी खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, माजी जि. प. सदस्या स्वाती बरदाडे, तोंडलचे सरपंच भीमराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते शंकर साळुंखे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष समीर काझी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, श्रावणी साळुंखे आदी उपस्थित होते.