युक्रेनच्या युवतीचे असामान्य शौर्य : विद्यापीठात शिकतेय 22 वर्षीय युवती : रॉकेट लाँचर हाताळण्यात तरबेज
रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. दोन्ही बाजूने होत असलेल्या हल्ल्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शहरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचदरम्यान एका युक्रेनियन युवतीने रशियाची दोन लढाऊ विमाने पाडविल्याचा दावा केला आहे. एक 22 वर्षीय युवती काही आठवडय़ांपूर्वी विद्यापीठात शिक्षण घेत होती, परंतु आता तिने 2 रशियन लढाऊ विमाने आणि एक लढाऊ हेलिकॉप्टर सोल्जर लाँच रॉकेटच्या मदतीने पाडविले आहे. इग्ला इन्फ्रारेड सरफेस टू एअर मिसाइलचा कशाप्रकारे वापर केला जातो हे या युवतीने विद्यापीठात शिकले होते. याच माहितीच्या आधारे ही युवती आता याप्रकरणी तज्ञ ठरली आहे.
रशियन हस्तकांची सर्वत्र उपस्थिती असल्याने तिची ओळख गुप्त ठेवण्यात येत आहे. कारण रशियाचे हस्तक तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करु शकतात. युक्रेनियन सैनिकांना जमिनीवरून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्रांना हाताळण्याचे कौशल्य प्राप्त आहे. याचमुळे रशियाला अद्याप युक्रेनवर स्वतःचा ताबा मिळविता आलेला नाही.
काय आहे इग्ला
जमिनीवरून आकाशात मारा करणाऱया इन्फ्रारेड मिसाइल इग्लाची रशियाने 1975 मध्ये निर्मिती सुरू केली होती. हे क्षेपणास्त्र विशेषकरून आकाशात शत्रूचे लढाऊ विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर नष्ट करण्यासाठी वापरले जाते. हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने मारा करू शकते आणि 11 हजार फुटांच्या उंचीपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. भारताने देखील हे तंत्रज्ञान रशियाकडून खरेदी केले असून लडाखमध्ये चीन सीमेवर तैनात करण्यात आले आहे.
टॉमेटोंचा मारा, ड्रोन जमीनदोस्त
मागील महिन्यात एका युक्रेनियन महिलेने टॉमेटो आणि त्याचा जार फेकून रशियन ड्रोन नष्ट करण्यास यश मिळविले होते. या महिलेचे नाव एलेना असल्याचे समोर आले होते. घराच्या बाल्कनीत बसले असताना एका ड्रोनचा आवाज ऐकू आला. ड्रोनवर नजर पडता प्रारंभी घाबरले. रशिया अशाप्रकारच्या ड्रोनचा वापर युक्रेनमध्ये इमारती पेटविण्यासाठी करत असल्याचे वृत्त टीव्हीवर पाहिले होते. याचमुळे त्वरित किचनमधून टॉमेटो आणून ड्रोनवर त्याचा मारा करण्यास सुरुवात केली. ड्रोन नष्ट व्हावा असा माझा प्रयत्न होता आणि हेच घडल्याचे एलेनाने सांगितले आहे.
लांबलेले युद्ध
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मागील 40 दिवसांपासून सुरू आहे. रशियाला जोरदार प्रयत्न करूनही आतापर्यंत युक्रेनचा पाडाव करता आलेला नाही. अद्याप युक्रेनची अनेक शहरे रशियाच्या नियंत्रणात नाहीत. तर युक्रेनचे सैन्य शौर्याने रशियाच्या सैन्याला प्रतिकार करत आहे. कमी साधनसामग्री आणि आधुनिक तसेच मोठी शस्त्रास्त्रs नसतानाही युक्रेनच्या सैन्याने रशियाला मेठे नुकसान पोहोचविले आहे.