नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा विश्वचषक जेता अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने ‘चाहत्यांच्या आग्रहास्तव’ आपण पुढील फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणार असल्याचे जाहीर करत आश्चर्याचा एकच धक्का दिला. सोमवारी रात्री उशिरा इन्स्टाग्राम पोस्टवर त्याने पुनरागमनाचे स्पष्ट संकेत दिले. इंग्लंडविरुद्ध जानेवारी 2017 साली कटकमध्ये झळकावलेल्या शतकी खेळीतील एक छायाचित्रही त्याने यावेळी पोस्ट केले. अर्थात, भारतीय संघातून पुनरागमन करणार की टी-20 लीगमध्ये खेळणार, याचा खुलासा युवराजने केलेला नाही.
2011 विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार संपादन करणाऱया युवराजने जून 2019 मध्ये सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्त झाल्यानंतर युवराज काही लीग स्पर्धांमध्ये तसेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, अबु धाबी टी-10 लीग स्पर्धेत खेळला. युवराजने भारतीय संघातर्फे 304 वनडे व 40 कसोटी सामने खेळले असून त्यात अनुक्रमे 8701 व 1900 धावांचे योगदान दिले. याशिवाय, त्याच्या खात्यावर 111 वनडे बळीही आहेत.