चिपळुणात कॅशबॅक ऑफर का देत नाही याचा विचारला जाब
प्रतिनिधी/ चिपळूण
ग्राहकांना कॅशबॅक ऑफर का देत नाही, याचा जाब येथील युवासेनेच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक देऊन विचारला. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत लाभ देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
येथील बजाज फायनान्स या झटपट कर्ज देणाऱया खासगी कंपनीकडून ग्राहकांना वस्तू घेण्यासाठी कॅशबॅक ऑफरचे आमिष दाखवण्यात येते. प्रत्यक्षात ग्राहकांचे कर्जाचे हप्ते संपत आले तरी ही ऑफर देण्यास टाळाटाळ आहे. यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत युवासेनेकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्याने शहर संघटक निहार कोवळे, अमरदीप परचुरे आणि युवा सैनिकांनी सदर कार्यालयावर धडक देऊन चांगलाच दणका दिला. यावेळी नगरसेविका सीमा रानडे, पत्रकार सतीश कदम, संतोष पिलके यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला.
तसेच चिपळूण शहर व तालुक्यात किती जणांना ही ऑफर दिली आणि किती जणांना पूर्ण केली याबाबतची यादी मागितली असता त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांना धारेवर धरले असता वरिष्ठ पातळीवरुन सूत्रे हलली व तासाभरात यादी देऊन या सर्वांना 31 ऑगस्ट पर्यंत ऑफरचा लाभ देण्याचे कंपनीने सांगितले. दिलेल्या मुदतीत योजनेचा लाभ न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा युवासेनेने दिला असून ग्राहकांनी 8308602317, 9764169777 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.