युवा काँग्रेसचा सरकारच्या अपयशाचा मेणबत्त्या पेटवून निषेध
वार्ताहर /शिवोली
युवा काँग्रेसच्या सदस्यांनी मार्ना-शिवोली रस्त्यावरील खडय़ांत मेणबत्त्या पेटवून भाजपा सरकारच्या अपयशाचा निषेध केला. सरकारनेच घोषित केलेल्या वेळेत खड्डे बुझविणे सरकारला अपयश आले. मार्ना शिवोली येथे रविवारी रात्री युथ काँग्रेसतर्फे या निषेध कार्यक्रमचे आयोजन केले होते. यावेळी ऍड. वरद म्हार्दोळकर, हर्षा साळगावकर, चंदन मांदेकर, बबिता धारगळकर, ऍड. रोशन चोडणकर, सुदीप नाईक, उत्तर गोवा उपाध्यक्ष यश कोचरेकर, प्रणव परब व इतर उपस्थित होते.
भाजपा सरकारने गोमंतकीय जनतेला अनेक पोकळी आश्वासने दिली. ती कधीही पूर्ण केली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविले जाणार व एकही खड्डा दिसणार नाही असे आश्वासन दिले होते. पण शिवोली रस्त्यांवर अद्याप अनेक खड्डे तसेच दिसून येतात. लोकांना या खड्डय़ांतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते असे ऍड. रोशन चोडणकर यांनी सांगितले.
यश कोचरेकर गेल्या तीन वर्षांपासून शिवोलीतील रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. शिवोलीतील रस्त्यांचे डांबरीकरण अजून का होत नाही. अवघे तीन-चार महिने बाकी आहे निवणुकांसाठी. भाजपा सरकार कुठल्या तोंडी लोकांच्या दारी मते मागण्यासाठी जाणार. असे प्रश्न श्री. कोचरेकर यांनी उपस्थित करीत सरकाच्या वेळकाढूपणाच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.