ओटवणे / प्रतिनिधी:
असनिये सरपंच स्नेहल नामदेव असनकर यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना तात्काळ बी पॉझिटिव्ह रक्त असलेल्या प्लेटलेट्स डोनरची गरज होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेला समजताच त्यानी दोन युवक तात्काळ ओरोसला पाठवले. त्यामुळे या दोन्ही युवक व युवा रक्तदाता संघटनेने रक्ताच्या नात्यासह सामाजिक बांधिलकी जोपासली.
असनिये सरपंच सौ असनकर प्लेटलेट्स कमी झाल्याने ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना तात्काळ दोन रक्तदात्यांची आवश्यकता होती. असनिये येथील पर्यावरण प्रेमी संदीप सावंत यांनी युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी यांचे लक्ष वेधले. त्यानंतर संघटनेचे सागर सावंत व वैभव दळवी या त्वरीत ओरोस रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. या दोन्ही युवकांनी यापूर्वीही रक्तदान केलेले आहे. युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून निरपेक्षपणे रक्तदानाच कार्य केले जात असून आजवर अनेकांना जीवदान देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. या दोघा रक्तदात्यांसह युवा रक्तदाता संघटनेचे असनकर कुटुंबियांनी आभार मानले.