वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ ऑस्ट्रेलियाने तिसरे स्थान पटकाविले. शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱया स्थानासाठी प्ले-ऑफ सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणवर 2 गडय़ांनी विजय मिळविला.
या सामन्यात अफगाणने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अफगाणने 50 षटकांत 201 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 8 गडय़ांच्या मोबदल्यात 202 धावा जमवित हा सामना 2 गडी राखून जिंकला.
अफगाणच्या डावामध्ये मोहम्मद इसाकने 34 धावा तर कर्णधार सुलिमान शफीने 37 धावा जमविताना तिसऱया गडय़ासाठी 70 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी अफगाणची स्थिती 2 बाद 15 अशी केविलवाणी होती. ऑस्ट्रेलियाच्या सेलझमनने अफगाणच्या खेरोटे आणि नूर यांना बाद केले. इजाज अहमदने 81 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियातर्फे सेलझमनने 43 धावांत 3 गडी बाद केले. कोनोलीने 30 धावांत 2 बळी मिळविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना निवेतन राधाकृष्णनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकता आला. केलवेने शानदार अर्धशतक झळकविताना 51 धावा तर विलीने 13 धावा जमविल्या. या जोडीने पहिल्या गडय़ासाठी अर्धशतकी भागिदारी केली. अफगाणच्या नेनगेलियाने विलीचा त्रिफळा उडविला. त्यानंतर राधाकृष्णन आणि केल्वे यांनी 60 धावांची भर घातली.
अफगाणच्या नूर अहमदने केल्वेला 51 धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने केनोलीचा बळी मिळविला. राधाकृष्णन आणि हिगेन्स यांनी 40 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये हिगेन्सने 11 धावा जमविल्या. संघाला विजयासाठी 35 धावांची जरूरी असताना ऑस्ट्रेलियाचे हे दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यानंतर शॉ आणि मिलर यांनी 26 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शॉने 13 तर मिलरने 13 धावा जिमविल्या. ऑस्ट्रेलियाला विजय मिळविण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. त्यांच्या गार्डनरने विजयी चौकार फटकावला.