प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शनिवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आदर्श मराठी शाळा पुरस्कार वितरण व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. मराठा मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कागल येथील कृष्णांत पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.
मराठी शाळांची पटसंख्या घसरत असताना बेळगाव परिसरातील शाळांनी आपला वेगळा आदर्श निर्माण करत पटसंख्या वाढवत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण, यमकनमर्डी, खानापूर व निपाणी येथील आदर्श शाळांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते शाळांच्या शिक्षकांना बक्षीस वितरण करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांनाही विभागवार बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीचे व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना दीपक दळवी यांनी यापुढेही सीमालढा जिद्दीने लढा, असा सल्ला दिला. कृष्णांत पाटील यांनी ‘मी व माझी मातृभाषा : काल आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शहर समितीचे बी. ए. येतोजी, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, युवा नेते शुभम शेळके, खानापूर समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, निपाणी समितीचे अध्यक्ष बंडा पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, अॅङ सुधीर चव्हाण, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवि साळुंखे, वैशाली भातकांडे, माजी नगरसेवक संजय शिंदे, अमर यळ्ळूरकर, सुधा भातकांडे, आर. आय. पाटील यासह इतर उपस्थित होते.