लाल-पिवळा ध्वज हटवा अन्यथा भगवा फडकवू
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर समस्त सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तो ध्वज हटवावा यासाठी युवा समितीच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तो ध्वज हटवून समाजकंटकांवर कारवाई केली नाही तर महापालिकेवर भगवा ध्वज फडकवू असा इशारा देण्यात आला होता. त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि युवा समितीच्या पदाधिकाऱयांची बैठक पार पडली.
सदर झेंडा काढण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू असून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतील. तो ध्वज हटवेपर्यंत मराठी भाषिकांनी संयम ठेवावा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे 1 जानेवारी रोजी महानगरपालिकेवर भगवा ध्वज लावण्याचे स्थगित करण्यात आल्याचे सांगून शनिवार दि. 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.