टय़ुरिन : शनिवारी युवेंट्स स्टेडियममध्ये झालेल्या सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात जुवेंट्स संघाने केगलेरीचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करून गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. युवेंट्सतर्फे हे दोन्ही गोल पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोने नोंदविले.
या सामन्यात 38 व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रोनाल्डोने युवेंट्सचे खाते उघडले. 42 व्या मिनिटाला त्याने स्वत:चा आणि संघाचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरी रोनाल्डोने काही कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून विश्रांती घेतली होती. यापूर्वीच्या तीन सामन्यांत पोर्तुगालकडून खेळताना रोनाल्डोने एकमेव गोल नोंदविला होता. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात एसी मिलान आघाडीवर असून युवेंट्स दुसऱया स्थानावर आहे. या दोन संघामध्ये आता केवळ एका गुणांचा फरक आहे.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात लेझिओने क्रोटोनीचा 2-0 असा पराभव केला. ऍटलांटा आणि स्पिझीया यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.