नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युटय़ूब आणि जी-मेल या सोशल साईट्ससह ‘गुगल’शी संबंधित बहुतांश सेवा सोमवारी सायंकाळच्या दरम्यान पाऊण ते एक तासासाठी खंडित झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांचा (युजर्स) खोळंबा झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या सेवांमध्ये व्यत्यय जाणवू लागला. जी-मेलवर क्लिक केल्यास किंवा रिप्रेश केल्यास ‘टेम्पररी एरर (500)’ असा संदेश येत होता. तर, यु-टय़ूबसह गुगलच्या अन्य सेवांवर ‘असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही सेवा पूर्ववत करु’ अशा आशयाचा संदेश येऊ लागल्यामुळे वापरकर्त्यांची कामे खोळंबून राहिली. या समस्येदरम्यान जगातील काही देशांमध्ये गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरू होते. मात्र जी-मेल आणि युटय़ूब या साईट्स जगभर ‘डाऊन’ होत्या. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात असाच प्रकार घडला होता.
गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन, त्यांची जीमेल सेवा आणि युटय़ूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झाले होते. अनेक वापरकर्त्यांना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत होत्या. काही ठिकाणी गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरू होते. मात्र, जगभरात बऱयाच ठिकाणी गुगल, जीमेल आणि युटय़ूब या तिन्हीवर काम करताना समस्या जाणवत होत्या. ही समस्या नेमकी कशामुळे निर्माण झाली याबाबत सुरुवातीला स्पष्टीकरण मिळाले नसले तरी जवळपास पाऊण तासानंतर सर्व सेवा सुरळीत झाल्याने इंटरनेटप्रेमींसह वापरकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सेवा पुन्हा सुरू होताच सोशल मीडियावर या घटनेसंबंधी वेगवेगळय़ा मिम्स पडल्याचे दिसून येत होते.