ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्तरप्रदेशातही आरोग्य यंत्रणा कमी पडत आहेत. भाजपचे आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी यांच्या पत्नीलाही योग्यवेळी उपचार मिळू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रामगोपाल यांच्या पत्नी संध्या लोधी कोरोना संक्रमित होत्या. त्यांना उपचारासाठी आग्राच्या एस एन मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, बेड उपलब्ध न झाल्याने त्यांना काही काळ जमिनीवरच झोपून राहावं लागलं. अखेर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर लोधी यांना तीन तासानंतर बेड उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, संध्या यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली नाही.
लोधी हे फिरोजाबादेतील जनपदच्या जसरानाचे भाजप आमदार आहेत. उत्तरप्रदेशातील मेडिकल सुविधांच्या कमतरतेवर बोट ठेवत त्यांनी योगी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली आहे.