ऑनलाईन टीम / लखनऊ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे आणि माजी आयएएस ए. के. शर्मा यांच्यावर भाजपने एक मोठी जबाबदारी दिली आहे. ए. के. शर्मा यांना उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष करण्यात आले आहे. आयएएसचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात आल्यावर त्यांना फेब्रुवारीमध्ये एमएलसी करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांचा योगी मंत्रिमंडळात समावेश करण्याचा आणि त्यांना उपमुख्यमंत्री केले जाईल अशी चर्चा होती.
एमएलसी केल्यानंतर ए. के. शर्मा हे उत्तर प्रदेशात सक्रिय होते. विविध जिल्ह्यांमध्ये कोविड नियंत्रण अभियानात ते सहभागी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय क्षेत्र वाराणसीमध्ये कोरोना नियंत्रित करण्याच्या अभियानात त्यांचे विशेष योगदान होते.
भाजप प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी सांगितले की, या अशा लोकांच्या नियुक्तीमुळे पार्टी आणि संघठना अधिक मजबूत बनणार आहे. ए. के. शर्मा यांच्याबद्दल बोलताना शुक्ला म्हणाले की, ते मऊमधील असून तिथे त्याचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे पक्षाला अधिक ताकद मिळाली आहे. तसेच पूर्वाचलमध्ये पक्ष वाढविण्यास मदत मिळणार आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ मिळणार आहे.