वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी झालेल्या रोमांचक सामन्यात यूपी योद्धा, पुणेरी पलटन, जयपूर पिंक पँथर्स संघांनी निसटते विजय मिळविले.
यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सचा 36-35, पुणेरी पलटनने तेलुगू टायटन्सचा 34-33 आणि जयपूर पिंक पँथर्सने हरियाणा स्टीलर्सचा 40-38 अशा गुणांनी पराभव केला.
शनिवारच्या पहिल्या सामन्यात यूपी योद्धाने शेवटच्या क्षणाला केलेल्या चालीवर थरारक विजय नोंदवत विजयाचे 5 गुण मिळविले. शेवटच्या चालीत पाटणा पायरेट्सने यूपीच्या सुरेंदर गिलला व्यवस्थित टॅकल केल्यानंतर आपण सामना टाय केलाय, असाच त्यांचा समज झाला होता. पण रायडर सुरेंदर गिलने एक बोनस गुण मिळवित केवळ एका गुणाने यूपी योद्धाचा विजय निश्चित केला. योद्धासाठी परदीप नरवालने सर्वाधिक 12 गुण मिळविले. त्याने शानदार सुरुवात करून देताना पहिल्या चढाईतच दोन बोनस गुण मिळविले. त्यानंतरच्या चढाईत त्याने दोन गुण मिळविले. पाटणा पायरेट्सच्या मोनू गोयत व प्रशांत कुमार राय यांना प्रारंभी झगडावे लागले. दहाव्या मिनिटाला योद्धाच्या श्रीकांत जाधवने 3 गुणांचा सुपर रेड केल्यानंतर पाटणाचे दोनच खेळाडू मैदानात राहिले होते. पण त्यांच्या अष्टपैलू सचिनने महत्त्वाचा रेडपॉईंट मिळविला आणि नंतर सुपर टॅकल करीत आणखी एक गुण घेतला. यानंतर पाटणाने बऱयापैकी मुसंडी मारताना चार सुपर टॅकल्स केले आणि मध्यंतराला पाटणाने 20-12 अशी आघाडी मिळविली होती. या सत्रात एकाही संघाला ऑलआऊट करण्यात यश आले नाही.
उत्तरार्धात दोन्ही संघांच्या बचावफळीने उत्तम कामगिरी केल्याने दोघांनीही सुपर टॅकल्स नोंदवले. पण पाटणाच्या काही चुकांमुळे यूपी योद्धाने या सत्रातील दहाव्या मिनिटाला पाटणाला ऑलआऊट करण्याची संधी साधत तीन गुणांची आघाडी घेतली आणि ती अखेरच्या काही मिनिटांपर्यंत राखली. पण पायरेट्सने जोरदार लढत देत यूपीशी बरोबरी साधली. पण शेवटच्या चढाईत सुरेंदरने प्रसंगावधान राखत बोनस गुण मिळवित यूपीचा विजय साकारला.
पुणेरी पलटनची टायटन्सवर मात
मोहित गोयत व अस्लम इनामदार यांनी शेवटच्या दोन मिनिटात शानदार खेळ करीत पुणेरी पलटनला तेलुगू टायटन्सवर एका गुणाने रोमांचक विजय मिळवून दिला. टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने 15 गुण मिळविले तर पुणेच्या मोहितने 9 गुण मिळविले. पहिल्या दहा मिनिटांत देसाई व अस्लम यांना आक्रमणात यश मिळाले. देसाईने पाच रेडपॉईंट मिळविले तर पुणेच्या नवोदित अस्लमने 3 गुण घेतले. त्यांनी बचाव करतानाही गुण मिळविले. मध्यंतराला दोन मिनिटे असताना देसाईने रेड टाकली. पण परतताना तो घसरला आणि त्याचा हात बाजूच्या लॉबीवर पडल्याने तो आऊट झाला. विशेष म्हणजे पुणेरी पलटनच्या खेळाडूंनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते लॉबीत गेल्याने तेही आऊट झाले. यामुळे टायटन्सला 4 तर पलटनला एक गुण मिळाला. यावेळी पलटनचा एकच खेळाडू मैदानात राहिला होता. टायटन्सने त्याला बाद करीत पलटनला ऑलआऊट करून मोठी आघाडी घेतली.
देसाईने नंतर सुपररेड करीत 3 गुण मिळविल्यानंतर टायटन्सला मध्यंतराला 6 गुणांची आघाडी मिळाली. पलटनने दुसऱया सत्रात शानदार प्रदर्शन करीत टायटन्सची आघाडी कमी केली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या मोहित गोयतने चढाईत तिघांना बाद करून ऑलआऊट साधले. बचावफळीने आणखी दोन गुण मिळविल्याने पलटनने 25-22 अशी आघाडी घेतली. इनामदारने शेवटच्या चढाईत एक गुण घेत पलटनला एका गुणाची आघाडी मिळवून दिली. टायटन्सच्या राकेश गौडाने बोनस गुण मिळवून बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला हा गुण मिळाला नाही आणि पुणे विजयी झाले.
स्टीलर्सची प्रयत्न अपुरे
तिसऱया सामन्यात हरियाणा स्टीलर्सने कठोर प्रयत्न केले पण अखेर त्यांना पिंक पँथर्सकडून 38-40 असा पराभव स्वीकारावा लागला. हरियाणाचा कर्णधार विकास कंडोलाने 14 रेडपॉईंट मिळविले. शेवटच्या मिनिटात स्टीलर्सच्या रोहित गुलियाने सुपर रेड टाकत जयपूरच आघाडी कमी केली. पण जयपूरने दोन गुणांची आघाडी कायम राखत विजय साकारला.