वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या 71 व्या सामन्यात अभिषेक सिंग आणि फझल अत्राचलीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यू मुंबा संघाने तेलगु टायटन्सचा 42-35 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱया एका सामन्यात पुणेरी पलटणने बेंगळूर बुल्सवर 37-35 अशी मात केली. जयपूर पिंक पँथर्स आणि तामीळ थलैवाजचा यांच्यातील सामना 34-34 असा बरोबरीत राहिला.
यू मुंबा आणि तेलगु टायटन्स यांच्यातील सामन्यात अभिषेक सिंगने आपल्या चढायावर 15 गुण तर फझल अत्राचलीने 6 टॅकल गुण मिळविले. तेलगु टायटन्सतर्फे आदर्शने सुपर 10 गुण नोंदविले. या सामन्यात यू मुंबा संघाने आपले वर्चस्व अधिकवेळ राखले होते. सातव्या मिनिटाला यू मुंबाने तेलगु टायटन्सचे सर्वगडी बाद करून भक्कम आघाडी घेतली. मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना तेलगु टायटन्सचे दुसऱयांदा सर्वगडी बाद झाले. मध्यंतरावेळी यू मुंबाने तेलगु टायटन्सवर 22-17 अशी पाच गुणांची आघाडी घेतली. सुरिंदर सिंग आणि आदर्श यांनी खेळाच्या उत्तरार्धात तेलगु टायटन्सला बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न केले. शेवटच्या 10 मिनिटांच्या कालावधीत तेलगु टायटन्सचा संघ 8 गुणांनी पिछाडीवर होता. अखेर तेलगु टायटन्सला हा सामना 7 गुणांच्या फरकाने गमवावा लागला.
शनिवारच्या दुसऱया एका सामन्यात पुणेरी पलटणने बेंगळूर बुल्सचा 37-35 अशा दोन गुणांच्या फरकाने पराभव केला. पुणेरी पलटण संघातील मोहित गोयतने एकूण 13 गुण नोंदविले. पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी बेंगळूर बुल्सच्या पवण सेहरावतला रोखत बेंगळूर संघाला स्पर्धेच्या गुणतक्त्यातील आघाडीच्या स्थानावर झेप घेण्यापासून रोखले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणे संघाने बेंगळूर संघावर 16-15 अशी केवळ एका गुणांची आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास 1 मिनिट बाकी असताना पुणे संघाने दोन गुणांची आघाडी कायम राखत बेंगळूर बुल्सचे आव्हान संपुष्टात आणले. पुणे संघातील बदली खेळाडू शुभम शेळकेने शेवटच्याक्षणी आपल्या संघाला महत्त्वाचे गुण मिळवून दिले.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या अन्य एका सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तामीळ थलैवाजला 34-34 असे गुण बरोबरीत रोखून हा सामना टाय राखला. या सामन्यातील शेवटच्या 30 सेकंदामध्ये जयपूर पिंक पँथर्सने दोन महत्त्वाचे गुण घेत तामीळ थलैवाजला विजयापासून रोखले. जयपूर पिंक पँथर्सतर्फे अर्जुन देसवालने 15 गुण तर संदीप धुलने 3 टॅकल गुण तसेच तामीळ थलैवाजतर्फे अजिंक्य पवारने 13 गुण त्याचप्रमाणे त्याने 2 टॅकल गुण मिळविले.