प्रो कबड्डी लीग : अभिषेक सिंग, प्रशांत कुमार, नवीन कुमार यांची चमक
वृत्तसंस्था / बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील शनिवारी झालेल्या विविध सामन्यात यू मुंबाने तेलगू टायटन्सचा तर पाटणा पायरेट्सने गुजरात जायंट्सचा आणि दबंग दिल्लीने उत्तरप्रदेश योद्धाचा पराभव केला.
यू मुंबा आणि तेलगु टायटन्स यांच्यातील सामन्यात यू मुंबाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 48-38 अशा गुणांनी शानदार विजय मिळविला. यू मुंबा संघातील रिंकुने 7 गुण तर रायडर अभिषेक सिंगने सुपर 10 गुणांसह एकूण 13 गुण नोंदविले. सुरूवातीपासूनच यू मुंबाच्या खेळाडूंनी सामन्यावर आपली पक्कड अधिक मजबूत केली होती. सामन्यातील 9 व्या मिनिटाला यू मुंबाने तेलगु टायटन्सचे पहिल्यांदा सर्वगडी बाद करून 7 गुणांची आघाडी घेतली. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना यू मुंबाने तेलगु टायटन्सचे सर्व गडी दुसऱयांदा बाद करत मध्यंतरापर्यंत 28-13 अशी 15 गुणांची आघाडी मिळविली. सामन्याच्या उत्तरार्धात यू मुंबाने 10 व्या मिनिटाला तिसऱयांदा तेलगु टायटन्सचे सर्व गडी बाद करून 17 गुणांची भक्कम आघाडी घेतली. सामना संपण्यास 4 मिनिटे बाकी असताना तेलगु टायटन्सने यू मुंबाचे सर्व गडी पहिल्यांदा बाद केले पण शेवटी अभिषेक सिंगने सुपर-10 गुण मिळवित यू मुंबाला 10 गुणांच्या फरकाने विजय मिळवून दिला.
पाटणाची गुजरातवर निसटती मात
दुसऱया सामन्यात पाटणा पायरेट्सने गुजरात जायंट्सचा 27-26 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील विजयामुळे पाटणा संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. दबंग दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. या सामन्यात मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने गुजरात जायंट्सवर दोन गुणांची आघाडी मिळविली होती. पाटणा संघातर्फे प्रशांतकुमार राय, सचिन महिंद्र रजपूत तर गुजरात जायंट्सतर्फे राकेश नरवाल आणि अंकीत यांची कामगिरी चमकदार झाली. सामना संपण्यास केवळ 30 सेकंद बाकी असताना पाटणा पायरेट्सच्या रायने आपल्या चढाईवर निर्णायक गुण घेत गुजरात जायंट्सचे आव्हान संपुष्टात आणले.
यूपी योद्धाचा पराभव
या स्पर्धेतील झालेल्या तिसऱया सामन्यात नवीन कुमारच्या शानदार आक्रमक आणि अचूक चढायांच्या जोरावर दबंग दिल्लीने उत्तरप्रदेश योद्धाचा 37-36 अशा गुणफरकाने पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. या सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात नवीन कुमारच्या 10 यशस्वी चढाया नोंदविल्या गेल्या. दिल्ली दबंगने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमविलेला नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत उत्तरप्रदेश योद्धाने दिल्लीवर 18-13 अशी आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना नवीनकुमारच्या शानदार कामगिरीमुळे दिल्ली दबंगने पुन्हा उत्तरप्रदेश योद्धा संघावर 26-25 अशी आघाडी मिळविली. नवीन कुमारने या सामन्यातील शेवटचा गुण मिळवित दिल्ली दबंगला 4 गुणांच्या फरकाने विजय मिळवून दिला. नवीन कुमारने 17 गुण तर यूपी योद्धातर्फे प्रदीप नरवालने 9 गुण मिळविले.