यूपी योद्धा तामिळ थलैवाजकडून पराभूत, यूपीच्या सुरेंदर गिलचे प्रयत्न वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी झालेला हरियाणा स्टीलर्स व यू मुम्बा यांच्यातील सामना 24-24 असा टाय झाला तर दुसऱया सामन्यात तामिळ थलैवाजने यूपी योद्धावर 39-33 अशा फरकाने विजय मिळवित पाचव्या स्थानावर झेप घेतली.
अतिशय रोमांचक ठरलेल्या मुंबई व हरियाणा यांच्यातील सामन्यात मुंबईने उत्तरार्धात बराच वेळ आघाडी घेतली होती. पण हरियाणा स्टीलर्सने झुंजार खेळ करीत शेवटी 24-24 अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटात दोन्ही संघांचा तोडीस तोड खेळ झाल्यानंतर 14 व्या मिनिटाला मुंबईने 4-3 अशी आघाडी मिळविली. पुढच्या मिनिटापर्यंत दोघांत चुरस पहावयास मिळाली. पण 10-8 अशी आघाडी घेतल्यानंतर हरियाणाला जोर मिळाला. त्यांनी 18 व्या मिनिटाला उत्तम टॅकल करीत 11-9 अशी आघाडी घेतली. पुढच्याच मिनिटाला त्यांनी आणखी एकदा उत्तम टॅकल करीत 12-9 अशी तीन गुणांची आघाडी मिळविली. पूर्वार्ध संपण्यास काही सेकंद असताना यू मुम्बानेही यशस्वी टॅकल केल्यानंतर ब्रेकला हरियाणाने 12-10 अशी बढत मिळविली.
उत्तरार्धातही हरियाणाच्या बचावफळीने उत्तम टॅकल करीत अनेक गुण मिळवून आघाडी वाढविली. 28 व्या मिनिटाला मुंबईने टॅकल व चढाईचे गुण मिळवित हरियाणाची आघाडी कमी केली आणि काही क्षणानंतर मुंबईने 15-15 अशी बरोबरीही साधली. 31 व्या मिनिटाला मुंबईने हरियाणाला ऑलआऊट करीत 3 गुणांची आघाडी मिळविली. 33 व्या मिनिटाला रोहित गुलियाने उत्कृष्ट चढाई करीत मुंबईच्या जवळ मजल मारली. पण मुंबईने गुण मिळवित आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. 38 व्या मिनिटाला विनयने सुरेख रेड टाकली तरी मुंबईने 22-21 अशी आघाडी राखली. शेवटच्या मिनिटापर्यंत हरियाणाने संघर्ष चालू ठेवत आशा कायम राखल्या. फक्त 30 सेकंद बाकी असताना कंडोलाने रेडपॉईंट मिळवित हरियाणाला 24-24 अशी बरोबरी साधून दिली.
तामिळ थलैवाजचा विजय
दुसऱया सामन्यात तामिळ थलैवाजने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या बळावर यूपी योद्धाला 39-33 असे हरविले. या विजयानंतर त्यांनी गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळविले. मनजीतने थलैवाजसाठी 7 गुण मिळविले तर यूपी योद्धाच्या सुरेंदर गिलने शानदार प्रदर्शन पुढे चालू ठेवताना 14 गुण मिळविले. पहिल्या सहा मिनिटानंतर दोघांत 4-4 अशी बरोबरी झाली होती. मुंबईच्या गुरदीपने सुपर टॅकल करीत आपल्या संघासाठी दोन गुण मिळविले होते. पण त्या प्रयत्नात तो लॉबीत गेल्याने तो बाद झाल्यानंतर यूपीचा एकच खेळाडू मॅटवर राहिला. थलैवाजने त्याला बाद करून ऑलआऊट साधत 12-6 अशी बढत मिळविली.
ऑलआऊटनंतर यूपी योद्धाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. पण थलैवाजने पाच गुण मिळवित त्यांचे प्रयत्न फोल ठरविले आणि मध्यंतराला 21-10 अशी मोठी आघाडी घेतली. उत्तरार्धात यूपी योद्धाच्या सुरेंदर गिलने गुण मिळविण्याचा सपाटा सुरू ठेवत थलैवाजची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि थलैवाजचा एकच खेळाडू मॅटवर राहिला. त्याला बाद करीत यूपीने थलैवाजची आघाडी केवळ दोन गुणांवर आणून ठेवली. यानंतर थलैवाजच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करीत आपली आघाडी 5 गुणांवर आणली. मनजीतने नंतर योद्धाला ऑलआऊट करीत 8 गुणांची आघाडी घेतली. परदीप व सुरेंदर यांनी ही आघाडी कमी केली असली तरी अखेरीस यूपीला पराभव स्वीकारावा लागला.
आजचे सामने
1) पाटणा पायरेट्स वि. तामिळ थलैवाज
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) बेंगळूर बुल्स वि. जयपूर पिंक पँथर्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्ने हॉटस्टार.