क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
10 वर्षांखालील राज्य खुल्या आणि मुलींच्या बुद्बिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण 8 खेळाडू संयुक्तपणे आघाडीवर आहेत. कालपासून या स्पर्धेला म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदीरात सुरूवात झाली. बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेने या स्पर्धेचे आयोजन लायन्स क्लब थिवी व गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीच्या सहकार्याने केले आहे.
स्पर्धेत 50 खेळाडूंनी भाग घेतला असून यातील चार खेळाडू फिडे मानांकनप्राप्त आहेत. स्पर्धेच्या खुल्या गटात अभीर प्रभू, इर्वीन आल्बुकर्क, सारस पोवार, राजवीर पाटील, सचित पै, शुभ बोरकर आणि वेदांत शिरोळे तर मुलींच्या गटातून नव्व्या नार्वेकर, जॅन्सिना सिकेरा, दिया सावळ, स्कायला रॉड्रिग्स, लिया मॅरिसिल सिल्वेरा हे खेळाडू दोन सामन्यांतून प्रत्येकी 2 गुणांनी संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन आमोणकर विद्यामंदीराचे ट्रस्टी गुरुदास नाटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक मुख्याध्यापिका पुजा दळवी, बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वास पिळर्णकर, सचिव डॉ. सुशांत धुळापकर, उपाध्यक्ष शिरीष दिवकर आणि मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल उपस्थित होते. स्पर्धेतील उर्वरीत सर्व राऊंड आज मंगळवारी खेळविण्यात येणार असून त्यानंतर बक्षीस वितरण होईल.